नवी मुंबई : नवी मुंबई शहरात औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कारखान्यांमधून होत असलेल्या जल आणि वायू प्रदूषण विरोधात प्रदूषण मंडळाने कारवाईचा बडगा उगारला आहे. जानेवारी ते ३० ऑगस्टपर्यंत प्रदूषण करणाऱ्या एकूण ६५ कारखान्यांवर प्रदूषण मंडळाची कारवाई करण्यात आली आहे.
नवी मुंबई शहरात पूर्व दिशेला मोठी औद्योगिक वसाहत आहे.आणि येथील रासायनिक कारखान्यामधून रासायनिक द्रव्य तसेच वायू सोडत असल्याने वाशी, कोपरी, खैरणे, घणसोली आदी भागात रोजच वायू प्रदूषण होऊन दर्प वास येत असतो. याविरोधात स्थानिकांनी वारंवार प्रदूषण मंडळाकडे तक्रारी केल्या आहेत. त्यानंतर प्रदूषण मंडळाने मनपा आणि एमआयडीसी अधिकाऱ्यांसमवेत औद्योगिक वसाहतीत संयुक्त पाहणी दौरा केला. त्यात कारखान्यांसोबतच येथील नागरी वस्त्यांमधून देखील सांडपाण्याद्वारे प्रदूषण होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे यावर तत्काळ लघुकालिन, मध्यावधी आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या सूचना मार्च महिन्यात देण्यात आल्या होत्या. मात्र सदर सूचना देऊन देखील येथील कारखानदारांनी प्रदूषणाचे सत्र कायम ठेवले आहे. त्यामुळे अशा कारखान्यांवर प्रदूषण मंडळाने कारवाईचा बडगा उगारला असून जानेवारी २०२३ ते ३० ऑगस्टपर्यंत प्रदूषण करणाऱ्या एकूण ६५ कारखान्यांवर प्रदूषण मंडळाने कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे नवी मुंबई उप प्रादेशिक अधिकारी जयंत कदम यांनी दिली आहे.
प्रदूषण करणाऱ्या उद्योगांविरोधात १८ जणांना कारणे दाखवा नोटीस, ३१ जणांना प्रस्तावित निर्देश, १४ जणांना अंतरिम निर्देश आणि दोन कारखाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.