जिल्हा
ठाण्यातील अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणारा आका कोण?
ठाण्यातील अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणारा आका कोण?
फोटो: ठाणे वैभव
पत्रकार परिषदेत विक्रांत चव्हाण यांचा घणाघात
ठाणे: ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांबाबत उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेत महापालिका आयुक्तांच्या उपस्थित कारवाई करण्याचे आदेश दिले होते. असे असतानाही सद्यस्थितीत शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे निर्माणाधीन आहेत. परंतु या बांधकामांवर कारवाई करताना अधिकारी मात्र थातूरमातूर कारवाया करताना दिसतात. त्यामुळे या बांधकामांना पाठीशी घालणारा आका कोण, असा प्रश्न ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
ठाणे शहरात सद्यस्थितीत येऊरसह 300 च्या वर अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. अशा अनधिकृत बांधकामांबाबत मी 2021 साली तक्रार केली असता लोकायुक्तांनी अनधिकृत बांधकामांना वीज-पाणी देऊ नये असे आदेश दिले होते. तरी देखील इमारतींना वीज, पाणी दिले गेले. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? अनधिकृत बांधकाम प्रकरणी सहाय्यक आयुक्तांच्या चौकशीचे काय झाले? येऊर वनपरिक्षेत्रात बांधकाम परवानगी नसताना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित करत अनधिकृत बांधकामे कोणाच्या आशिर्वादाने झाली, यात कोणाचे पैसे गुंतलेले आहेत, यांचे विकासक कोण, वीज आणि पाणी देणारे अधिकारी कोण, या बांधकामांवर वरदहस्त असलेला ठाण्यातील आका कोण.? या सर्वांची चौकशी करून मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली. याबाबत आयुक्तांनी ठोस भूमिका न घेतल्यास जनहित याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे आणि प्रवक्ते हिंदुराव गळवे उपस्थित होते.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475