टेम्भी नाक्यावरील ठामपा शाळेची दशा
ठाणे: अवघ्या सहा महिन्यांपूर्वी दुरुस्त केलेल्या टेम्भी नाका येथिल शाळेची दुरावस्था झाली असून पावसाळ्यात वर्गात पाणी गळते, तर उन्हाळ्यात पत्रे तापल्याने वर्गात प्रचंड उकाडा होतो. या दुहेरी त्रासामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
ठाण्यातील टेंभी नाका परिसरातील ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक ७ मधील शाळेत १२० गरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेच्या वर्गावर असलेले लोखंडी पत्रे तातडीने काढून त्या ठिकाणी सिमेंटचे पत्रे बसवावेत, अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे.
सर्वसामान्य गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी ठाणे महापालिका प्रयत्न करत आहे. शिक्षण आणि शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जात आहेत. असे असताना टेंभी नाका येथील शाळा क्रमांक ७ची अवस्था अतिशय दयनीय झाली असल्याचे उघडकीस आले आहे. शाळेच्या वर्गावर लोखंडी पत्रे टाकण्यात आले असून ते गंजले आहेत. पावसाळ्यात या पत्र्यांमधून पाणी गळत असल्याने वर्गात पाणी साचते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे दप्तर, पुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्य भिजण्याची शक्यता असते. त्यातच उन्हाळ्यात लोखंडी पत्रे तापल्याने वर्गातील तापमान वाढते. परिणामी विद्यार्थ्यांना वर्गात बसणेही कठीण होते. लोखंडी पत्रे गंजल्याने ते कमकुवत झाले असून अपघात होण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, संभाव्य दुर्घटनेची वाट न पाहता प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पालकांनी ठाणे महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार अर्ज सादर केला आहे. वर्गावरील जुने लोखंडी पत्रे काढून त्याऐवजी नवीन सिमेंटची पत्रे बसवावेत आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात शिक्षण घेता यावे, अशी विनंती अर्जाद्वारे करण्यात आली आहे. आता महापालिका प्रशासन या तक्रारीची दखल घेऊन किती लवकर कार्यवाही करते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.