जिल्हा
एपीएमसी बाजारात भाज्या कडाडल्या
एपीएमसी बाजारात भाज्या कडाडल्या
फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई : अवकाळी पाऊस आणि अतिउष्णतेमुळे भाज्यांचे उत्पादन आणि त्याच्या दर्जावरही परिणाम होत आहे. वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने दर वधारले असून शिमला मिरची, वांगी, फरसबी, काकडीच्या दरात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
एपीएमसी बाजारात मंगळवारी ५९४ गाड्यांची आवक झाली असून यामध्ये शिमला मिरची, फरसबी, वांगी आणि काकडीची आवक घटल्याने दर १० ते १५ टक्क्यांनी वाढले आहेत, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.
मंगळवारी एपीएमसीत काकडी ३९२ क्विंटल आवक, शिमला मिरची १४८२ क्विंटल, फरसबी ७६ क्विंटल, वांगी ३२३ क्विंटल, वाटाणा १०४५ क्विंटल आवक झाली आहे. टोमॅटो, गवार, भेंडी, कोबी, फ्लॉवर, गाजराचे दर स्थिर असून हिरवी मिरची, हिरवा वाटाणा दर उतरले आहेत.
आधी घाऊक बाजारात फरसबी प्रतिकिलो ४०-४५ रुपयांनी उपलब्ध होती, त्यामध्ये १० रुपयांची वाढ झाली असून आता ५०-५५ रुपयांनी विक्री होत आहे. प्रतिकिलो शिमला मिरची आधी २०-२२ रुपये होती, ती आता ३०-३२ रुपयांनी विकली जात आहे. प्रतिकिलो काकडी १२-१४ रुपयांवरून १६-१८ रुपये तर वांगी प्रतिकिलो १२ रुपयांवरून १६ रुपयांनी विकली जात आहेत.
एकंदरीत या भाज्यांची १० ते १५ टक्के दरवाढ झाली आहे तर हिरवी मिरची आणि मटारचे दर मात्र घसरले आहेत. आधी वाटाणा प्रतिकिलो ८० रुपये होता, तो आता ६० रुपयांवर आला आहे. हिरवी मिरची १६-२० रुपयांनी विक्री होत आहे, अशी माहिती येथील घाऊक भाजीपाला व्यापाऱ्यांनी दिली.
भाजी आताचे दर आधीचे दर
काकडी १६-१८ १२-१४
शिमला मिरची ३०-३२ २०-२२
फरसबी ५०-५५ ४०-४५
वांगी १६ १२
हिरवी मिरची १६-२० २०-३०
वाटाणा ६० ८०
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475