जिल्हा
वसई-विरार, नालासोपारा पाण्यात
वसई-विरार, नालासोपारा पाण्यात
फोटो: ठाणे वैभव
रेल्वे प्रवाशांचा ट्रॅकवरून पायी प्रवास
मुंबई: मुंबईसह उपनगरांना पावसाने झोडपून काढले असतानाच, वसई-विरार परिसरात मान्सूनने अत्यंत रौद्र रूप धारण केले आहे. गेल्या 12 तासांत तब्बल 325 मि.मी. इतका रेकॉर्डब्रेक पाऊस कोसळल्याने वसई-विरार शहराला पुराच्या पाण्याने वेढले आहे.
या मुसळधार पावसाचा सर्वात मोठा फटका पश्चिम रेल्वेला बसला असून नालासोपारा रेल्वे स्थानकासह अनेक ठिकाणचे रेल्वे रुळ पाण्याखाली गेले आहेत. रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे हजारो प्रवासी वेगवेगळ्या स्थानकांवर अडकून पडले आहेत.
कोणतीही पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसल्याने शेवटी हताश झालेल्या प्रवाशांना वसई ते नालासोपारा दरम्यान रेल्वे रुळांवरूनच पायी प्रवास करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. डोक्यावर मुसळधार पाऊस आणि पायाखाली रेल्वे रुळांवर साचलेले पाणी अशा अत्यंत बिकट परिस्थितीत नागरिक जीव मुठीत धरून वाट काढत आहेत.
वसई-विरारमधील अतिवृष्टीमुळे केवळ रेल्वेच नाही, तर रस्ते वाहतूकही पूर्णपणे कोलमडली आहे. रिक्षा, टॅक्सी आणि एसटी बस सेवा ठप्प झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. शहरात दुपारनंतरही पावसाचा कहर सुरूच असल्याने मुख्य महामार्गावर पाणी साचले आहे. परिणामी, अत्यावश्यक सेवा पुरवणारी वाहने शहरात येऊ शकलेली नाहीत. यामुळे वसई-विरारमध्ये आता दूध आणि भाजीपाल्याची तीव्र टंचाई निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.
शहरातील अनेक सखल भागांमधील घरांमध्ये आणि तळघरात पुराचे पाणी शिरले आहे. बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. रात्रभरापासून सुरू असलेला पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने आता वसई-विरारकर नागरिक देवाकडे पाऊस थांबण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
या मुसळधार पावसाचा फटका विरार पश्चिमेला असलेल्या वसई-विरार शहर महानगरपालिका मुख्यालयालाही बसला आहे. पालिकेचा संपूर्ण मुख्यालय परिसर जलमय झाला असून गुडघाभर पाणी साचले आहे. ज्या भागात यापूर्वी कधीही पाणी साचले नव्हते, त्या उच्चभ्रू वस्त्यांमध्येही पाणी साचल्याने नागरिकांनी पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
300x450
300x600