विकासकाला १० हजारांचा दंड
कल्याण : हवा प्रदूषण नियंत्रणाच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी न केल्याप्रकरणी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ‘फ’ प्रभाग क्षेत्र कार्यालयाने दोन बेकऱ्या सील केल्या असून, एका विकासकाला १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. सहायक आयुक्त प्रसाद ठाकूर यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली.
‘फ’ प्रभाग क्षेत्रातील भोईरवाडी येथील रुबीना बेकरी आणि त्रिमूर्तीनगर येथील श्रीकृष्ण बेकरीमध्ये दैनंदिन कामकाजासाठी लाकडाचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी संबंधित बेकरीचालकांना यापूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, नोटिशीनंतरही आवश्यक उपाययोजना करण्यात न आल्याने या दोन्ही बेकऱ्या सील करण्यात आल्या.
रुबीना बेकरीचे संचालक आसिफ खान आणि श्रीकृष्ण बेकरीचे संचालक सुनील पडियार यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली. सहायक आयुक्त प्रसाद ठाकूर यांच्या नियंत्रणाखाली स्वच्छता निरीक्षक नारखडे आणि पुरी यांनी कारवाई केली.
दरम्यान, डोंबिवली पूर्वेतील आर. पी. रोड परिसरात पुनर्वसनाचे काम सुरू असताना मे. पॅराडाईज डेव्हलपर्स या विकासकाकडून लोखंडी सळया, लोखंडी अँगल, रेती आणि खडी यांसारखे बांधकाम साहित्य रस्त्यावर विखुरलेल्या अवस्थेत ठेवण्यात आल्याचे आढळले. यामुळे हवा प्रदूषण नियंत्रणाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाल्याने संबंधित विकासकाला १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.