नवघर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
भाईंदर: मीरा-भाईंदर शहरात खळबळ उडवून देणाऱ्या 'शगुन गोल्ड' दुकानावरील कोट्यवधींच्या सोन्याच्या चोरीचा छडा लावण्यात नवघर पोलिसांना अखेर यश आले आहे. दुकानातील विश्वासू नोकरानेच आपल्या साथीदाराच्या मदतीने चार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे चार किलो ३०० ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले होते. या प्रकरणी पोलिसांनी अत्यंत वेगाने तपासाची चक्रे फिरवत मुख्य आरोपी नोकरासह त्याच्या साथीदाराला जयपूर (राजस्थान) येथून बेड्या ठोकल्या आहेत.
मीरा रोड पूर्वेकडील विनय पार्क परिसरातील दीपक हॉस्पिटलच्या मागे राजेश बाफना (४२) यांचे 'शगुन गोल्ड' नावाचे सराफा दुकान आहे. काही दिवसांपूर्वी बाफना हे काही कामानिमित्त दुकानाबाहेर गेले असता, दुकानाचा नोकर दिनेश चौहान (३५) याने दुकानातील तिजोरी आणि काउंटरमध्ये ठेवलेले सोन्याचे हार, चैन, ब्रेसलेट, मंगळसूत्र आणि अंगठ्या असा कोट्यवधींचा मुद्देमाल गोळा केला आणि तो घेऊन फरार झाला. बाफना जेव्हा दुकानात परतले, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. भरदिवसा झालेल्या या कोट्यवधींच्या चोरीमुळे संपूर्ण मिरा-भाईंदर परिसरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले होते.
घटनेची माहिती मिळताच मीरा भाईंदर -वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासासाठी विशेष पथके तयार केली. पोलिसांनी दुकानातील व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, नोकर दिनेश रावत हाच बॅग भरून जाताना कॅमेऱ्यात कैद झाला होता.
पोलिसांनी तात्काळ आरोपीचे मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक विश्लेषण सुरू केले. तपासात दिनेश चौहान हा त्याचा साथीदार ललित सिंग याच्या मदतीने खासगी वाहनाने राजस्थानच्या दिशेने पळून गेल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नवघर पोलिसांचे एक विशेष पथक तातडीने राजस्थानला रवाना झाले. जयपूर परिसरामध्ये स्थानिक पोलिसांच्या मदतीने नवघर पोलिसांनी वेषांतर करून पाळत ठेवली आणि अत्यंत शिताफीने दिनेश रावत व ललित सिंग या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींची कसून चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
जवळपास सर्व मुद्देमाल जप्त
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून चोरीला गेलेले सोन्याचे दागिने यशस्वीरित्या जप्त केले आहेत. नवघर पोलिसांच्या या अत्यंत वेगवान आणि कौतुकास्पद कामगिरीमुळे सराफा असोसिएशन आणि स्थानिक नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली असून, या गुन्ह्यात अन्य कोणाचा हस्तपेक्ष आहे का, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.