जिल्हा

टाक्या आहेत, पाणी संपले; ठामपाचे नियोजन फसले!

टाक्या आहेत, पाणी संपले; ठामपाचे नियोजन फसले!
टाक्या आहेत, पाणी संपले; ठामपाचे नियोजन फसले! फोटो: ठाणे वैभव

घोडबंदरमधील पाणीटंचाईवर सेना-भाजपातील नगरसेवक महासभेत आक्रमक

ठाणे : घोडबंदर भागात ठाणे महापालिकेच्या पाण्याच्या टाक्या असूनही त्यात पाणी नाही, पम्प बंद आहेत. त्यामुळे लाखोंची कर्जे घेऊन सदनिका खरेदी करणाऱ्यांना पाण्याच्या टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. नागरिकांची तहान भागविण्याची क्षमता नसताना नव्या बांधकामांना मात्र परवानग्या दिल्या जात असल्याने शुक्रवारी महासभेत महापालिकेच्या नियोजनावर नगरसेवकांनी चांगलेच तोंडसुख घेतले.

महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत घोडबंदर परिसरात पाण्याचा प्रश्न पेटला. या भागात महापालिकेच्या पाण्याच्या टाक्या आणि पम्प आहेत. मात्र नागरिकांना नियमित पाणी मिळत नाही. यामुळे अनेक भागांतील नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर घोडबंदरचा पाणीप्रश्न पुन्हा एकदा शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत चर्चेला आला. पाण्याची उपलब्धता नसतानाही मोठ्या बांधकामांना परवानगी दिली जात असल्याचा आरोप करीत भाजपचे नगरसेवक नारायण पवार, शिवसेनेचे नगरसेवक संजय भोईर, मनोज शिंदे, यज्ञा भोईर, भाजपाच्या नगरसेविका कमल चौधरी यांच्यासह घोडबंदर भागातील लोकप्रतिनिधीनी प्रशासनाला धारेवर धरले. पाणीप्रश्न तातडीने सोडविला नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही सदस्यांनी दिला.

पाण्याची टाकी असूनही पाणी नाही आणि पम्पही बंद असल्याने या यंत्रणेचा उपयोग काय, असा सवाल नगरसेविका कमल चौधरी यांनी केला. नागरिकांची गैरसोय तातडीने दूर न झाल्यास पुढील सभेत आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. नगरसेविका यज्ञा भोईर यांनी घोडबंदरमधील पाणी समस्या अद्याप कायम असल्याचे सांगितले. नागरिकांकडून सातत्याने तक्रारी केल्या जात असतानाही प्रशासनाकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. नागरिकांना नियमित पाणी कधी मिळणार, असा प्रश्नही त्यांनी प्रशासनाला विचारला.

पाण्याच्या वाहिन्यांच्या कामासाठी वारंवार रस्ते खोदले जात असल्याचा मुद्दा नगरसेवक नारायण पवार यांनी उपस्थित केला. संबंधित कामातील ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे ठरले असतानाही त्यालाच पुन्हा कामे का दिली जात आहेत, असा प्रश्न त्यांनी केला. रस्ते खोदून कामे करण्याची आणि पुन्हा ते व्यवस्थित न करण्याची पद्धत थांबविण्याची मागणीही त्यांनी केली.

श्रीनगरमधील पाण्याच्या टाकीचा प्रश्नही सभेत उपस्थित झाला. जुनी टाकी पाडून त्या ठिकाणी नवीन टाकी उभारण्यासाठी निविदा काढण्यात आली. मात्र, निविदा प्रक्रिया होऊन दीड वर्ष उलटले तरी प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही, अशी माहिती मनोज शिंदे यांनी दिली. त्यामुळे नागरिकांना नियमित पाणीपुरवठा कधी होणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांनी प्रभागनिहाय पाणीपुरवठ्याच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यात येतील, असे आश्वासन दिले. सदस्यांनी मांडलेल्या सूचनांवर आवश्यक कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475