नवी मुंबई : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर -माझा फर्स्ट चॉइस” गृहनिर्माण योजनेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या ४,७७९ सदनिकांची संगणकीय सोडत शुक्रवार, 11 सप्टेंबर 2026 रोजी सिडको भवन, सीबीडी बेलापूर येथे झाली.
यावेळी सहव्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयल, सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे; आयटी एनआयसी संचालक लक्ष्मीकांत गरजे आणि नरेंद्र भामरे, पणन व्यवस्थापक (गृहनिर्माण) श्रीनिवास मोकळीकर तसेच सिडकोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सिडकोतर्फे 15 ऑगस्ट 2026 रोजी या गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आला होता. या योजनेअंतर्गत तळोजा सेक्टर-३९ येथे ४,२२९, कळंबोली बस डेपो येथे २५७ आणि खारघर बस डेपो येथे २९३ सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. योजनेतील काही सदनिका या दिव्यांग अर्जदारांसाठी राखीव होत्या. या संगणकीय सोडतीमध्ये एकूण ३,१४२ अर्जदार विजेते ठरले आहेत. सोडत पूर्णतः पारदर्शक व मानवी हस्तक्षेपविरहित पद्धतीने पार पडली असून यशस्वी अर्जदारांची यादी www.cidcohomes.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या गृहनिर्माण योजनेद्वारे विजेत्या अर्जदारांचे नवी मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरात घर घेण्याचे स्वप्न साकार झाले आहे.