जिल्हा
जलपर्णी काढल्याने कामवारी नदीचा प्रवाह झाला मोकळा
जलपर्णी काढल्याने कामवारी नदीचा प्रवाह झाला मोकळा
फोटो: ठाणे वैभव
भिवंडी: शहरालगत असलेल्या कामवारी नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर जलपर्णी उगवून ऐन पावसाळ्यात नदीच्या प्रवाहात अडथळा निर्माण होऊन जवळच असलेल्या शेलार गावास पुराचा धोका निर्माण झाला होता. याबाबत 'ठाणेवैभव'ने वृत्त प्रसिद्ध करताच महसूल विभागाने दखल घेत कार्यवाही केली.
भिवंडी तालुक्यातून वाहणाऱ्या कामवारी नदीच्या शेलार व भिवंडी दरम्यानच्या पात्रात मागील दोन-तीन महिन्यांपासून जलपर्णी उगवली होती. भिवंडी-वाडा मार्गावर नदीलगत वाढलेल्या लोकवस्तीमुळे त्यामधून वाहणारे सांडपाणी नदीच्या पात्रात गेल्याने गेल्या दोन-तीन वर्षांपासून सतत पावसाळ्यापूर्वी जलपर्णी उगवते. या जलपर्णीची नदीपात्रात वाढ होऊन तेथे जंगल बनते. अशा वेळी महसूल विभाग आणि भिवंडी महानगरपालिका यांनी समन्वयाने यामागील कारणे शोधून त्यावर उपाययोजना करणे अपेक्षित आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने पावसाळ्यात ही जलपर्णी पाण्याच्या प्रवाहास अडथळा ठरते.
यावर्षी पावसाळा सुरु होताच तिसऱ्या दिवसापासून पावसाचा जोर वाढल्याने भिवंडी शहराजवळ जलप्रवाहास जलपर्णीचा अडथळा निर्माण झाला. याबाबत 'ठाणेवैभव'मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेत तहसीलदार अभिजित खोले यांनी भिवंडी महसूल विभाग आणि भिवंडी महानगरपालिका यांच्या समन्वयाने कामवारी नदीमधील जलपर्णी नदीपात्रातून बाहेर काढून जलप्रवाहाचा मार्ग मोकळा केला. याबाबत शेलार ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
300x450
300x600