जिल्हा

चिमुकलीच्या हंड्याची प्रशासनाला झळ

चिमुकलीच्या हंड्याची प्रशासनाला झळ
चिमुकलीच्या हंड्याची प्रशासनाला झळ फोटो: ठाणे वैभव
पाण्यासाठी कातकरी महिलांचा पंचायत समितीवर हंडा मोर्चा शहापूर: डोक्यावर रिकामा हंडा घेऊन पंचायत समिती कार्यालयात बसलेली ही चिमुकली केवळ एका आंदोलनाचा भाग नाही तर ग्रामीण भागातील पाणीटंचाईचे विदारक वास्तव मांडणारे वास्तव चित्र आहे. शहापूर तालुक्यातील पाषाणे ग्रामपंचायत हद्दीतील काजळविहीर येथील आदिवासी कातकरी वाडीतील महिलांनी पिण्याच्या पाण्यासाठी पंचायत समितीसमोर हंडा मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. त्या आंदोलनात सहभागी झालेल्या या बालिकेच्या डोक्यावरचा हंडा प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उभे करताना दिसत होता. काजळविहीर येथील १७ कुटुंबांना अद्याप नळ पाणीपुरवठ्याचा लाभ मिळालेला नाही. गावातील मुख्य वस्तीपर्यंत पाणीपुरवठा पोहोचला असला तरी कातकरी वाडी मात्र या मूलभूत सुविधेपासून वंचित आहे. परिणामी महिलांसह लहान मुलांनाही दररोज पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. पंचायत समिती कार्यालयात महिलांनी डोक्यावर हंडे घेऊन ठिय्या आंदोलन केले. पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनादरम्यान अनेक महिलांसोबत लहान मुलेही उपस्थित होती. त्यामध्ये डोक्यावर हंडा सांभाळून बसलेल्या चिमुकलीचे दृश्य उपस्थितांच्या मनाला चटका लावणारे ठरले. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार तीन महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीच्या बैठकीत कातकरी वाडीला नळ पाणीपुरवठा सुरू करण्याचा ठराव मंजूर झाला होता. आठ दिवसांत काम पूर्ण करण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. दरम्यान आंदोलनावेळी गटविकास अधिकारी व पाणीपुरवठा अधिकारी हे मंत्रालयीन बैठकीसाठी बाहेरगावी गेले होते असे समजले. सहाय्यक गटविकास अधिकारी उपस्थित असले तरी कोणतीही ठोस हमी न मिळाल्याने आंदोलनकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. शहापूरसारख्या आदिवासीबहुल तालुक्यातील कातकरी वाड्यांतील नागरिकांना अजूनही पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे. काजळविहीर येथील घटना ग्रामीण भागातील पाणीपुरवठा व्यवस्थेतील वास्तव अधोरेखित करणारी ठरत आहे, अशी प्रतिक्रिया श्रमजीवी संघटनेचे सचिव प्रकाश खोडका यांनी दिली. या आंदोलनाचे नेतृत्व श्रमजीवी संघटनेचे माजी अध्यक्ष झिपा वाघ, गाव कमिटी प्रमुख नीता वाघ आणि मीना हिलम यांनी केले.

संबंधित बातम्या

Advertisement 300x450

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement 300x600