ठाणे: ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन संघटना व सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजना यांच्या वतीने व महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेच्या अंतर्गत 'योनेक्स सनराईज ठाणे जिल्हा सब ज्युनिअर रँकिंग बॅडमिंटन स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. ही मानांकन स्पर्धा मंगळवार, २९ सप्टेंबर ते शुक्रवार, २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलातील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल येथे रंगणार आहे.
या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत केवळ ठाणे जिल्ह्यातील हौशी खेळाडूंनाच सहभाग घेता येणार असून, वयोगटनिहाय स्पर्धा प्रकारांची आखणी करण्यात आली आहे. यामध्ये मिनी मुले व मुली (९ वर्षांखालील १ जानेवारी २०१८ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेले) या वयोगटासाठी केवळ एकेरी सामने होणार आहेत. मिनी मुले व मुली (११ वर्षांखालील १ जानेवारी २०१६ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेले) या वयोगटात एकेरी आणि दुहेरी सामने खेळवले जातील. तर सब ज्युनिअर मुले व मुली (१३ वर्षांखालील १ जानेवारी २०१४ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेले) या वयोगटात एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरी अशा तिन्ही प्रकारांमध्ये चुरस पाहायला मिळेल. प्रत्येक खेळाडूला जास्तीत जास्त तीन प्रकारांत सहभाग नोंदवण्याची मुभा असून, सर्व सामने बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया (BAI) आणि महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या अधिकृत नियमांनुसार १५ गुणांच्या तीन गेम्समध्ये खेळवले जाणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावरून (www.mbasso.in) ऑनलाइन प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख २४ सप्टेंबर २०२६ असून, नाव मागे घेण्याची मुदत २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत असेल. त्यानंतर २८ सप्टेंबर रोजी स्पर्धेचे ड्रॉ व अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत वाड यांच्या अध्यक्षतेखाली विशेष आयोजन व स्पर्धा समिती कार्यरत आहे. स्पर्धेच्या प्रवेशिका व अन्य सर्व माहितीसाठी संदीप कांबळे 9004181388, मयूर घाटणेकर 9619711171 आणि फूलचंद पासी यांच्याशी 9867182548 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.