ठाणे: महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित 'योनेक्स सनराईज ठाणे जिल्हा मिनी रँकिंग बॅडमिंटन स्पर्धा २०२६' मध्ये ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे.
११ वर्षांखालील मुलांच्या एकेरीच्या अंतिम सामन्यात ठाण्याचा खेळाडू योहान नायर याने ठाण्याच्याच वीर तराडेचा १५-०१, १५-०५ असा पराभव करत विजेतेपद पटकावले, तर वीर तराडे उपविजेता ठरला. १३ वर्षांखालील मुलांच्या एकेरीच्या अंतिम लढतीत ठाण्याचा खेळाडू अल्फी मक्कडथ याने ठाण्याच्याच पीयुष सुतारवर १५-०८, १५-११ अशी मात करत विजेतेपद मिळवले, तर पीयुष उपविजेता ठरला. १३ वर्षांखालील मुलींच्या एकेरीच्या चुरशीच्या सामन्यात ठाण्याची खेळाडू शनाया तावटे हिने ठाण्याच्याच आर्या शिंदेचा १५-०९, १५-१३ असा पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले, तर आर्या शिंदे उपविजेती ठरली. तसेच, १३ वर्षांखालील मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात ठाण्याचे खेळाडू अल्फी मक्कडथ आणि आर्या शिंदे या जोडीने ठाण्याच्याच पीयुष सुतार आणि शनाया तावटे या जोडीचा १५-११, १७-१५ असा पराभव करत विजेतेपद पटकावले, तर पीयुष व शनाया उपविजेते ठरले.
ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व खेळाडूंनी हे यश संपादन केले आहे. तसेच प्रशिक्षक टीममधील अक्षय देवलकर, मितेश हजरनीस, मयूर घाटणेकर, राजीव गणपुले, नरेंद्र वर्मा, मानस्वी वैद्य, जीत शिरोडकर, फुलचंद पासी, कबीर कंझारकर आणि एकेंद्र दर्जी या सर्व प्रशिक्षक टीमचे खेळाडूंना उत्तम मार्गदर्शन लाभले. या सर्व विजेत्या खेळाडूंचे अकॅडमीतर्फे विशेष कौतुक करण्यात येत आहे. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ माजी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू अक्षय देवलकर, मितेश हजीरनीस त्याच प्रमाणे संदीप कांबळे यांच्या हस्ते पार पडला.