जिल्हा

तरुणाला हॉटेल मालकासह टोळक्याकडून मारहाण

तरुणाला हॉटेल मालकासह टोळक्याकडून मारहाण
तरुणाला हॉटेल मालकासह टोळक्याकडून मारहाण फोटो: ठाणे वैभव

जेवणाच्या ऑर्डरवरून वाद

ठाणे : हिरानंदानी इस्टेट येथील हबीबीज हॉटेलमध्ये जेवणाच्या ऑर्डरवरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रथम एगडे (२४) या तरुणाने पोलिसांत दिलेल्या जबाबानुसार, हॉटेल मालक अंकीत अग्रवाल यांच्यासह ६ ते ७ अनोळखी व्यक्तींनी त्याला हाताबुक्क्यांनी, लाथांनी आणि काठीने मारहाण केली. या घटनेत त्याच्या आईलाही व मावशीलाही धक्काबुक्की व मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

प्रथम एगडे हा सोशल मीडिया व डिजिटल मार्केटिंगचे काम करतो. त्याच्या जबाबानुसार, ३ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास तो आपल्या मैत्रिणीसोबत हबीबीज हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेला होता. त्याने स्टार्टर आणि मेन कोर्सची ऑर्डर दिली होती. मात्र वेटरने स्टार्टरऐवजी मेन कोर्स आधी आणल्याने एगडेने वेटरला याबाबत विचारणा केली. यानंतर वेटर हॉटेलमालक अंकीत अग्रवाल यांना घेऊन आल्याचे एगडेने आपल्या जबाबात म्हटले आहे. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि अग्रवाल यांनी आपल्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप त्याने केला. त्यानंतर आपल्याला हॉटेलबाहेर काढण्यात आले आणि तेथे अग्रवाल यांच्यासह काही जणांनी मारहाण केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

घटनेनंतर एगडेने आपल्या आईला फोन करून बोलावले. रात्री सुमारे दहा वाजता त्याची आई तृप्ती दासानी, मावशी जोत्सना पेठे आणि इतर नातेवाईक घटनास्थळी आले. आई भांडण मिटवण्याचा प्रयत्न करीत असताना वाघबीळ परिसरातील ६ ते ७ जण तेथे आले आणि त्यांनी कोणतीही विचारपूस न करता आपल्याला हाता-बुक्क्यांनी, लाथांनी तसेच काठीने मारहाण केल्याचा आरोप एगडेने केला आहे. या मारहाणीत आपल्या पाठीला, उजव्या हाताला आणि गळ्याला दुखापत झाल्याचे त्याने जबाबात नमूद केले आहे. तसेच मारहाणीदरम्यान गळ्यातील सोन्याची चेन कुठेतरी पडल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले. दरम्यान, एगडेच्या आईला आणि मावशीला देखील धक्काबुक्की करून हाताच्या बुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हाणामारी थांबवून संबंधितांची सुटका केली. त्यानंतर एगडे आणि त्याची आई वैद्यकीय उपचारासाठी गेले. प्रकृती अस्वस्थ असल्याने काही काळ विश्रांती घेतल्यानंतर एगडेने पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली. या प्रकरणी हॉटेल मालक अंकीत अग्रवाल आणि इतर ६ ते ७ अनोळखी व्यक्तींविरुद्ध एगडेने कायदेशीर तक्रार दाखल केली असून, मारहाण, शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475