गाडी आणि रिक्षांचा चक्काचूर, अपघातात ९ जण जखमी
नवी मुंबई : नवी मुंबईतील सायन-पनवेल महामार्गावरील बेलापूर खिंड येथे रविवारी सायंकाळी ब्रेक निकामी झाल्यामुळे एका एसटी बसवरील नियंत्रण सुटले आणि तीन रिक्षा तसेच तीन गाड्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात एकूण ९ जण जखमी झाले असून त्यांच्यावर नजिकच्या दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
मुंबईहून मुरुडकडे जाणारी एस टी बस खिंड ओलांडून उतारावर आली असतानाच अचानक तिचे ब्रेक निकामी झाले. चालकाने वाहन नियंत्रित करून रस्त्याच्या कडेला घेण्याचा प्रयत्न केला, परंतु बसने पुढे चाललेल्या सहा वाहनांना धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की अनेक कार आणि रिक्षांचा चक्काचूर झाला. या अपघातात कार आणि रिक्षांमधील प्रवाशांसह एकूण नऊ जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी सीबीडी बेलापूर येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही; बसचा चालक आणि त्यातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच सीबीडी पोलीस ठाण्याचे पथक, वाहतूक उपायुक्त घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदत व बचाव कार्य सुरू केले. पोलिसांनी अपघातग्रस्त कार आणि रिक्षांमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात हलवले. या अपघातामुळे सायन- पनवेल मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. वाहतूक पूर्ववत करण्यासाठी पोलिसांनी रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहने हटवण्यास सुरुवात केली. सीबीडी पोलिसांनी या अपघाताबाबत गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. तसेच, ब्रेक निकामी होण्याचे कारण आणि अपघातापूर्वी चालकाने बस नियंत्रित करण्यासाठी केलेले प्रयत्न यांबाबतही अधिकारी तपास करत आहेत, असे बेलापूर पोलीस निरीक्षक लखन रासकर यांनी सांगितले.
पोलिसांच्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी बसमध्ये १० प्रवासी होते. त्यापैकी कोणालाही दुखापत झाली नाही आणि सर्वजण सुरक्षित आहेत. त्या घटनेनंतर, सर्व प्रवाशांना दुसऱ्या बसने त्यांच्या निर्धारित प्रवासाकरिता पाठवण्यात आले.