शहापूर: शहापूर तालुक्यातील डोळखांब परिसरात बिबट्याचे दिवसाढवळ्या दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गुंडे येथील चैतन्य हायस्कूल परिसरातही बिबट्या दिसल्याचे समोर आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
बिबट्याने गावातील कोंबड्या तसेच कुत्र्यांचा फडशा पाडल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. बिबट्याच्या वावराबाबत सामाजिक कार्यकर्ते संकेत चौधरी यांनी वनविभागाकडे पत्रव्यवहार करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान वनविभागाकडून परिसरात कॅमेरे व पिंजरे लावण्यासाठी मागणी करण्यात आली आहे. डोळखांब परिसरात मानवी वस्ती आणि जंगलाचा जवळचा संबंध असल्याने वन्यप्राण्यांचा वावर अधूनमधून आढळतो. मात्र आता बिबट्या थेट शालेय परिसरात आणि दिवसाढवळ्या दिसू लागल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने केवळ कॅमेरे व पिंजरे लावण्यापुरती कार्यवाही न करता बिबट्याचा नेमका वावर शोधून त्याला पकडण्यासाठी ठोस मोहीम राबवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. शाळा परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने विद्यार्थ्यांना एकटे सोडू नये तसेच पहाटे व सायंकाळच्या वेळेत नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.
गुंडे परिसरात बिबट्याचा वावर दिवसाढवळ्या दिसत असून त्यामुळे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. याबाबत मी वनविभागाकडे पत्रव्यवहार करून तातडीने कॅमेरे व पिंजरे लावण्याची मागणी केली आहे. एखादी दुर्घटना घडण्यापूर्वीच वनविभागाने ठोस उपाययोजना करावी यासाठी वनविभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संकेत चौधरी यांनी केली आहे.