नवी मुंबई : नशामुक्त नवी मुंबई अभियानांतर्गत नवी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक तीव्र केली आहे. ३० सप्टेंबर रोजी एकूण २०१ गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले ७२६ किलो वजनाचे आणि २६ कोटी ३० लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीत कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून नष्ट करण्यात आले.
या कारवाईसह नवी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत १९२ गुन्ह्यांमधील ११३ कोटी ४४ लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ नष्ट केले आहेत. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. अंमली पदार्थांविरोधात जनजागृतीसाठी शाळा, महाविद्यालये, सोसायट्या व सार्वजनिक ठिकाणी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामुळे नशामुक्त अभियान अंतर्गत कारवाई वाढवण्यासाठी नागरिकांनी अंमली पदार्थांबाबतची माहिती ८८२८-११२-११२ या हेल्पलाईनवर गोपनीय पद्धतीने द्यावी, असे आवाहन यावेळी पोलिसांनी केले आहे.