जिल्हा
प्रायोजकत्वासाठी ठामपाची धावाधाव!
प्रायोजकत्वासाठी ठामपाची धावाधाव!
फोटो: ठाणे वैभव
मॅरेथॉनचा खर्च सव्वा कोटी, तरतूद फक्त ३० लाखांची!
ठाणे: तब्बल सहा वर्षांनी होत असलेल्या ठाणे महापालिकेच्या वर्षा मॅरेथॉनचा खर्च सव्वा कोटींच्या आसपास जात असून त्यासाठी तरतूद मात्र ३० लाखांचीच करण्यात आली आहे. त्यामुळे स्पर्धेच्या प्रायोजकत्वासाठी ठाणे महापालिकेची धावाधाव सुरू झाली आहे.
ठाणे महापालिकेत महासभा अस्तित्वात नसल्याने यावर्षी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनऐवजी वर्षा मॅरेथॉन असे नामकरण स्पर्धेचे करण्यात आले आहे. या स्पर्धेत एकूण १० लाख ३८,९०० रुपयांची पारितोषिके, चषक व पदके असतील. प्रत्येक गटातील प्रथम विजेत्यास एक लाख रुपयांचे पारितोषिक आहे. तर, प्रत्येक गटात प्रथम १० विजेत्यांना पारितोषिके व चषक देण्यात येणार आहेत.
ठाणे महापालिकेची ही ३१ वी वर्षा मॅरेथॉन १० ऑगस्ट रोजी होत असून सहा वर्षांनी पुन्हा देशविदेशातील मॅरेथॉनपटूंसह ठाणेकर नागरिक या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत. ठाणे महापालिका चषक ३१वी वर्षा मॅरेथॉन ही ठाण्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची मॅरेथॉन आहे. सहा वर्षांच्या खंडानंतर ही मॅरेथॉन होत असल्याने ही स्पर्धा प्रतिष्ठेची करण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांपासून ठाणे महापालिकेची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कोणत्याही गोष्टीवर खर्च करताना पालिका प्रशासनाला हात आखडता घ्यावा लागत आहे. मॅरेथॉन स्पर्धेसाठी ठाणे महापालिकेच्या वतीने ३० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र हे ३० लाख बक्षीसापोटीच खर्च होण्याची शक्यता आहे. तर इतर सर्व खरंच मिळून हा खर्च जवळपास एक ते सव्वाकोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता हा सर्व खर्च आता प्रयोजकांच्या माध्यमातून गोळा करण्यासाठी पालिकेने हालचाली सुरु केल्या आहेत. यासाठी प्रयोजकांच्या बरोबर पत्रव्यवहार देखील करण्यात येत आहे. एकूणच ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ठाणे महापालिकेला सर्वस्वी प्रयोजकांवरच अवलंबून राहावे लागणार आहे.
300x450
300x600