जिल्हा

रस्त्यांची चाळण ठाण्यात; कोटींचा खड्डा मात्र शासनाला

रस्त्यांची चाळण ठाण्यात; कोटींचा खड्डा मात्र शासनाला
रस्त्यांची चाळण ठाण्यात; कोटींचा खड्डा मात्र शासनाला फोटो: ठाणे वैभव
ठाणेकरांच्या खड्डेमुक्त प्रवासावर विरजण
ठाणे: ठाणे पालिका क्षेत्रातील रस्ते सुसज्ज व खड्डेमुक्त व्हावेत, या उद्देशाने मूलभूत सोयी-सुविधांच्या विकासासाठी राज्य शासनाने दिलेल्या करोडो रुपयांच्या निधीतून  तयार करण्यात आलेले रस्ते पुन्हा एकदा खोदण्यास सुरुवात झाल्याने पावसाळ्यात ठाणेकरांना खड्डेमुक्त सुखद प्रवासावर विरजण पडण्याची शक्यता आहे.
अवघ्या दोन वर्षांतच केबल आणि जलवाहिनी टाकण्यासाठी सुसज्ज रस्ते पुन्हा खोदले गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे महापालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, शासन निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप मनसेने केला आहे.
मनोरुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मधोमध सिमेंटचे रस्ते फोडून विद्युत वाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. मेट्रोच्या कामामुळे तसेच नवीन मुक्त महामार्ग तयार करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या पिलरकरिता रस्ता खोदला जात आहे. परिणामी, नव्याने तयार केलेले रस्ते अल्पावधीतच पुन्हा उकरले गेले आणि नागरिकांना खड्डेमय रस्त्यांचा सामना करावा लागत आहे.
या प्रकारामुळे केवळ आर्थिक नुकसानच झाले नसून नागरिकांच्या दैनंदिन प्रवासावरही मोठा परिणाम झाला आहे. वाहतूक कोंडी, धूळ आणि अपघातांचा धोका वाढल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचाही आरोप होत आहे. शासनाचा निधी वाया जात असताना जिल्हाधिकारी कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.
ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी शासनाची फसवणूक केली असून, संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. तसेच आयुक्तांनी सर्व रस्त्यांची पाहणी करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी जागरूक ठाणेकर करत आहे
 चौकट १
या योजनेअंतर्गत तयार करण्यात येणारे रस्ते खोदले जाणार नाहीत तसेच संबंधित रस्त्यांवर कोणतीही कामे केली जाणार नाहीत, असे राज्यशासनाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. शिवाय हे रस्ते अद्याप दोषदायित्व कालावधीत असताना त्यांची दुर्दशा करण्यात आली आहे.
चौकट २
महापालिकेच्या वतीने २०२२ मध्येच जलवाहिनी टाकण्याच्या प्रकल्पाचा आराखडा आणि अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना भविष्यातील कामांची कल्पना असतानाही रस्ते बांधकामावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आल्याचा आरोप जागरूक नागरिक करत आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475