क्रीडा

समतोलाच्या शोधात RCB, आत्मपरीक्षणाच्या वळणावर UPW

समतोलाच्या शोधात RCB, आत्मपरीक्षणाच्या वळणावर UPW
समतोलाच्या शोधात RCB, आत्मपरीक्षणाच्या वळणावर UPW फोटो: ठाणे वैभव
सोमवारी नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडेमीत यूपी वॉरियरझ आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आमने-सामने येणार असून, ही लढत खर्‍या अर्थाने उत्तर विरुद्ध दक्षिण अशीच ठरणार आहे.
WPL 2026ची सुरुवात दोन्ही संघांनी पूर्णपणे वेगवेगळ्या पद्धतीने केली आहे. 2024चे विजेते असलेल्या RCBने गतविजेत्या मुंबई इंडियन्सविरुद्ध थरारक विजयासह आपल्या मोहिमेला दमदार सुरुवात केली. दुसरीकडे, नवी कर्णधार मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखाली UPWला पहिल्याच सामन्यात गुजरात जायंट्सकडून अवघ्या 10 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
RCBच्या खात्यात दोन मौल्यवान गुण जमा झाले असले, तरी संघरचनेत काही गंभीर प्रश्न कायम आहेत. एलिस पेरीच्या अनुपस्थितीमुळे मधल्या फळीतील अनुभवाची कमतरता स्पष्टपणे जाणवते. नडीन डी क्लर्ककडून अधिक जबाबदारीची अपेक्षा असली, तरी फलंदाजी विभाग फारसा मजबूत वाटत नाही. कर्णधार स्मृती मानधना हिच्यासोबत सलामीला येणारी ग्रेस हॅरिस ही वरच्या फळीपेक्षा शेवटच्या षटकांतील फलंदाजीसाठी अधिक ओळखली जाते. तिसऱ्या क्रमांकावर असलेली दयालन हेमलता WPLमध्ये 18 पेक्षा कमी सरासरी राखते, तर डावखुरी फिरकीपटू म्हणून ओळख असलेली राधा यादव पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करते. कागदावर तरी ही फलंदाजी फळी फारशी भेदक वाटत नाही.
गोलंदाजी विभागातही विविधतेचा अभाव दिसतो. अरुंधती रेड्डी आणि डी क्लर्कसारख्या मध्यमगती गोलंदाजांसह राधा यादव आणि लिन्सी स्मिथसारख्या डावखुऱ्या फिरकीपटूंवर अवलंबून असलेला हा हल्ला फार प्रभावी वाटत नाही. पहिला सामना जिंकूनही योग्य समतोल साधण्यासाठी RCBकडून प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे.
UPWलाही आत्मपरीक्षणाची गरज आहे. गुजरात जायंट्सविरुद्ध सलामीला अपयशी ठरलेली किरण नवगिरे कदाचित दबावात असेल. फीबी लिचफिल्ड आणि डिआंड्रा डॉटिनसारखे पर्याय उपलब्ध असल्याने लॅनिंग नव्या सलामी जोडीदाराचा विचार करू शकते. गोलंदाजी विभाग कागदावर मजबूत असला, तरी शिस्त ढिली पडल्यास प्रतिस्पर्धी त्याचा फायदा घेऊ शकतात. मात्र, सोफी एक्लस्टन आणि दीप्ती शर्मा या दोन अव्वल दर्जाच्या फिरकीपटू असल्याने, किमान आठ षटकांतून धावांवर अंकुश आणि विकेट्स मिळण्याची खात्री वॉरियरझला नक्कीच असेल.
WPL 2026 अजून सुरुवातीच्या टप्प्यात असली, तरी सामने झपाट्याने येत असल्याने चुका सुधारण्यासाठी फारसा वेळ नाही. या पार्श्वभूमीवर स्मृती मानधना आणि मेग लॅनिंग यांच्यासाठी ही लढत केवळ गुणांसाठी नाही, तर संघातील त्रुटी दूर करण्याची महत्त्वाची संधी ठरणार आहे.
आमने-सामने (मागील 5 सामने)
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू – 3 | यूपी वॉरियरझ – 2   सामन्याची थोडक्यात माहिती दिनांक: 12 जानेवारी 2026 वेळ: सायंकाळी 7.30 वाजता स्थळ: डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडेमी, नवी मुंबई थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, जिओहॉटस्टार

संबंधित बातम्या

Advertisement 300x450

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement 300x600