जिल्हा
विनयभंगप्रकरणी आरोपीला ३५ दिवसांत शिक्षा
विनयभंगप्रकरणी आरोपीला ३५ दिवसांत शिक्षा
फोटो: ठाणे वैभव
* कल्याण जलदगती न्यायालयाचा निर्णय
* जलद वेळेत शिक्षा सुनावण्यात आलेला राज्यातील पहिला खटला असल्याचा दावा
कल्याण : कल्याणमध्ये विनयभंगप्रकरणी आरोपीला अवघ्या ३५ दिवसांत दोषी ठरवत न्यायालयाने एक वर्ष सक्त कारावासाची आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. राज्यात इतक्या जलद वेळेत शिक्षा सुनावण्यात आलेला हा पहिला खटला असल्याचा दावा पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी केला आहे.
खडकपाडा पोलीस ठाण्यात ३ जून रोजी एका महिलेने २९ वर्षीय ओंकार निकाळजे याच्याविरोधात विनयभंग आणि छेडछाडीची तक्रार दाखल केली होती. पोलीसांनी तत्काळ कारवाई करत त्याला त्याच दिवशी अटक केली. जलद तपास पूर्ण करून काही तासांत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. या गुन्ह्यातील साक्षी पुरावे तपासून न्यायालयाने आरोपी ओंकार निकाळजे याला बी.एन.एस कलम ७४ अंतर्गत एक वर्ष सक्त कारावासाची शिक्षा तसेच बी.एन.एस कलम ३२९ (३) अंतर्गत १ महिना साध्या करावासाची शिक्षा व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. दरम्यान दंडाच्या रकमेपैकी २५०० रुपये फिर्यादिला तर २५०० रुपये सरकार जमा करण्याचे निर्देश दिले. सरकारी पक्षातर्फे अभियोक्ता प्रकाश सपकाळे यांनी कामकाज पाहिले.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे यांच्या नियंत्रणाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित पवार, पोलीस हवालदार राजेंद्र ठोंबरे यांनी करून कोर्ट कारकून पोलीस हवालदार सुनील नलवडे, महिला पोलीस हवालदार समीक्षा पाटील यांनी साक्षीदार यांना मुदतीत न्यायालयात हजर ठेवून न्यायालयात नियमित सुनावणी दरम्यान विशेष मेहनत घेतली. या गुन्ह्यात दोषसिद्धी होऊन चांगली कामगिरी केलेली आहे.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475