जिद्द, मेहनत आणि अपार इच्छाशक्तीच्या जोरावर आपण कोणत्याही क्षेत्रात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण करू शकतो याचे तंतोतंत उदाहरण म्हणजे पुनम सरोदे. अभिनय आणि नृत्याच्या क्षेत्रात त्यांनी स्वतःचं एक खास स्थान निर्माण केलं आहे. त्यांचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. पुनम सरोदे यांना नृत्याची आवड लहानपणापासूनच होती. शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलनात त्यांनी पहिल्यांदा नृत्य सादर केलं, पण योग्य तयारी नसल्यामुळे त्यांना बाहेर काढण्यात आले. मात्र, त्यांनी हार न मानता वर्गाबाहेर उभं राहून निरीक्षण केलं आणि घरी जाऊन सराव केला. गणपती उत्सवात स्पर्धेत भाग घेऊन त्यांनी पहिले बक्षीस जिंकले आणि त्यांचा आत्मविश्वास वाढला. अभिनयाची आवड त्यांना कशी लागली, याचीही एक वेगळीच कहाणी आहे. त्यांना नाटकाच्या मागच्या प्रक्रिया जाणून घ्यायची इच्छा होती. त्यांच्याच नृत्य शिक्षकांनी त्यांना रंगायतनमध्ये नेऊन एकांकिका स्पर्धा दाखवली. सेट बदल, कपडे बदलण्याच्या प्रक्रियेने त्या चकित झाल्या आणि एकदा तरी नाटक करायचे असे त्यांना वाटू लागले. पुनम सरोदे यांना अभिनयाची खरी ओढ लागली ती 'वंचितांचा रंगमंच' या उपक्रमामुळे. हा उपक्रम ज्येष्ठ नाटककार स्व. रत्नाकर मतकरी यांच्या संकल्पनेतून आणि ठाण्यातील समता विचार प्रसारक संस्थेच्या वतीने राबवला जात होता. येथे वंचित मुलांना नाटक शिकवण्यात येत होते आणि या उपक्रमात पुनम यांनीही सहभाग घेतला. 'वंचितांचा रंगमंच'च्या संयोजिका हर्षदा बोरकर यांनी त्यांना अभिनयाचे महत्त्व सांगितले. येथेच 'उपरी' ही नृत्यनाटिका सादर करण्याची संधी पुनम यांना मिळाली आणि मतकरी सरांसमोर आपली कला सादर करणे, ही त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट ठरली. पुनम यांनी अनेक नाटकांमध्ये काम केले आहे, एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि आपली अभिनय क्षमता सिद्ध केली. २०१८ मध्ये त्यांनी 'Miss Talented in Thane 2018' हा किताब मिळवला. अभिनयासोबतच त्यांना नृत्याचीही आवड होती, त्यामुळे त्यांनी 'MJ Foundation' नावाच्या नृत्य गटात सहभाग घेतला. त्यामुळे त्यांना 'The Creole Festival, Seychelles' आणि 'Uganda' येथे महाराष्ट्राच्या लोकनृत्यांचे सादरीकरण करण्याची सुवर्णसंधी मिळाली. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक परराष्ट्र मंत्रालयाच्या आय.सी.सी.आर. विभागातर्फे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवण्याचे भाग्य त्यांना मिळाले. ठाणे आर्टगिल्ड (TAG) या संस्थेत त्यांचा प्रवेश झाला आणि येथे त्यांना अभिनयाचं सखोल ज्ञान मिळाले. अभिनयाचा प्रवास रंगभूमीपुरता मर्यादित न ठेवता पुनम यांनी मालिकांमध्ये देखील छोट्या भूमिका केल्या. याशिवाय ६४व्या दोन अंकी राज्य नाट्य स्पर्धेत ठाणे केंद्रातून प्रथम आलेल्या 'वेट लॉस' या नाटकातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. एक उत्तम अभिनेत्री बनण्याचा त्यांचा ध्यास त्यांना स्वस्थ बसू देत नाही. त्या सातत्याने त्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या प्रवासात त्यांचे कुटुंब त्यांना पूर्णपणे पाठिंबा देत आहे. अभिनयाच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी त्या अथक मेहनत घेत आहेत.
GENERAL
उत्तम अभिनेत्री बनण्याचा 'पुनम ' चा ध्यास
उत्तम अभिनेत्री बनण्याचा 'पुनम ' चा ध्यास
फोटो: ठाणे वैभव
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475