संपादकीय

सुन्न

सुन्न
सुन्न फोटो: ठाणे वैभव
थंडीचे दिवस आता कुठे संपत असताना तापमान अचानक वाढले आहे. हवामानातील बदलामुळे अवघे विश्व संत्रस्त असताना आणि त्यामुळे उडालेल्या हाहाकारास सामोरे कसे जायचे याचा विचार करीत असताना मानवनिर्मित संकटे सभोवतालावर विपरीत परिणाम घडवू लागली आहेत. मग ते युद्धे असोत की आर्थिक मंदीचे विघ्न, त्याचे दुरगामी परिणाम 12 हजार वर्षांच्या मानवी इतिहासास आव्हान देऊ पाहत आहे. हे जग कोणताही माथेफिरू माणूस फक्त आणि फक्त बारा मिनिटात अज्ञाताच्या विवरात पुन्हा त्या हजारो वर्षांच्या प्रवासास पुनश्च सुरू करण्याच्या शून्य स्थितीत नेऊ शकतो. हे भयावह चित्र आजच्या मानवाच्या जणू लक्षात आलेले दिसत नाही. या मानसिकतेला पुष्टी देणाऱ्या लहान-मोठ्या घटना त्यामुळेच वारंवार घडत आहेत. माणसाला झाले तरी काय आहे, असा उद्विग्न प्रश्न जनसामान्यांच्या मनात डोकावू लागला आहे. मुंबईत गेल्या आठवड्यात झालेल्या खळबळजनक राजकीय हिंसाचाराचा वरील पार्श्वभूमीवर विचार केला तर कोणाही सर्वसामान्य माणसाचे मन सुन्न झाल्याशिवाय राहिले नसेल. आयुष्य किती क्षणभंगुर असते आणि मृत्यू किती बेमालूमपणे तुमच्याजवळ आलेला असतो, याची कल्पनाही या घटनेतील मरणाऱ्या आणि मारणाऱ्याला नव्हती, हे पाहून आपण भयचकित झालो आहोत. ही दृष्ये मनपटलावरून बराच काळ पुसली जाण्याची शक्यता नाही. ती पुन्हा-पुन्हा तुमचा प्रत्यक्ष राजकारणाशी संबंध नसला तरी डोळ्यासमोर येत राहणार. राजकीय नव्हे तर सामाजिक चर्चाविश्वात त्यावर भाष्य होत राहणार. दुर्दैवाने अशा घटना अजरामर होऊन जातात आणि त्यातून बोध घेणारे काय विचार करतात, त्यांच्या मानसिकतेवर त्याचा काय परिणाम होतो आणि त्यांचा अखेर समाज जीवनावर काय परिणाम होतो, याचा अंदाज बांधणे कठीण होऊन बसते.राजकारणातील हिंसाचार असो वा गुन्हेगारीकरण, आपण मोठ्या नाखुशीने पूर्वीच स्वीकारले होते. नव्हे ते आपल्यावर लादले गेले कारण समाज म्हणून आपण त्याचा कधी प्रतिकार केला नाही. समाज म्हणताना हे कर्तव्य वास्तविक त्या-त्या पक्षांच्या नेत्यांनी पार पाडायला हवे होते, परंतु त्यांनी या पाशवी बळाचा खुबीने वापर करून घेतला. त्यांच्या नाकर्तेपणाची फळे आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये. एकाच पक्षातील दोन कार्यकर्ते इतक्या टोकाची भूमिका घेतात तेव्हा त्या खदखदीचा अंदाज येऊ नये याला काय म्हणावे? दोन प्रतिस्पर्धी पक्षात जितके वैर नसावे जितके पराकोटीचे ताणलेले तणाव स्वपक्षियांत आहेत. आणि ते निवडणुकीच्या काळात ज्वालामुखीचे रूप धारण करतील, अशी भीती वाटू लागली आहे. कल्याणमधील घटनेची कंपने थांबत नाहीत तोवर बोरिवली येथील त्याची पुनरावृत्ती अधिक गंभीर स्वरूपात उमटावी यावरून राज्यातील राजकारणाची पातळी आणि पोत किती खालावत चालला आहे याचा अंदाज यावा. ही घटना विशिष्ट पक्षाबद्दल, त्यांच्या नेतृत्वाच्या क्षमतांबद्दल वगैरे भाष्य करणारी ठरत नाही, तर एकूणच राजकीय विश्वाचा प्रवास अधोगतीच्या मार्गाने कसा झपाट्याने सुरू आहे याचा पुरावा देत आहे. याचा सर्वाधिक परिणाम आगामी निवडणुकीवर होऊ शकतो. सुन्न झालेला समाज मतदान केंद्रावर कोणत्या आशेने जाईल आणि लोकप्रतिनिधींकडून काय अपेक्षा ठेवील, असा प्रश्नांचा कल्लोळ आता सुरू झाला आहे. जे त्यांच्या डोळ्यासमोर घडले ते भयंकर वास्तव होते, तो चित्रपट नव्हता. तो थरार आणि त्यातून उद्भवलेले मृत्यू हे खरेखुरे होते. यापैकी कोणीच पुन्हा जिवंत होणार नव्हते, हा विचारच मती शून्य करणार होता. तो कथानकाच्या कल्पनाविलासाचा भाग नव्हता. ते सत्य होते आणि या सत्याचे प्रयोग पुन्हा होऊ नयेत अशी वेडी आशाही त्यामागे दडलेली आहे. राजकारणी इतके का बिथरले आहेत? त्यांना कशाची (मरणाची) घाई झाली आहे? जनतेची सेवा करण्यासाठी राजकीय मार्ग निवडला असेल तर तो निवडताना सामाजिक बंधने, संस्कार संवेदना, आदी विचार मागे का पडतात? स्वार्थ मोठा की जनसेवा? आर्थिक लागेबंधे महत्त्वाचे की नैतिकता? या सर्व बाबींचा विसर पडल्याचे पक्षांना आपल्या कार्यक्रमांना विधायक अजेंडा देण्याची गरज राहिलेली नाही. जिथे नेतेच भरकटले आहेत तिथे कार्यकर्त्यांकडून काय अपेक्षा बाळगावी म्हणा? एक नक्की की रात्र वैऱ्याची आहे आणि दिवस रक्तरंजित. सारे काही सुन्न करणारे!

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475