जिल्हा
रवींद्र फाटक यांचा बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा
रवींद्र फाटक यांचा बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा
फोटो: ठाणे वैभव
'मविआ'चे अभिजित पवार यांची माघार
ठाणे: ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने पुन्हा एकदा ठाणे शिवसेनेचे असल्याचे सिद्ध केले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र फाटक यांचा बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.
शिवसेना शिंदे गटाने विजयाचे झेंडा फडकावल्याने निवडणूक मतदानापूर्वीच संपुष्टात आली आहे. परंतु या निवडणुकीच्या निमित्ताने होणाऱ्या घोडेबाजारालाही लगाम लागला असल्याने अनेक मतदार नगरसेवकांचा मात्र हिरमोड झाला आहे.
ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार माजी आमदार रवींद्र फाटक आणि महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अभिजित पवार यांच्यात थेट लढत होणार होती. दोन्ही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरताना शक्तिप्रदर्शनही केले होते. मात्र उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी या सर्व घडामोडींना ट्विस्ट आला आहे.
अभिजित पवार यांनी वैयक्तिक कारणास्तव माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे रवींद्र फाटक हे एकमेव उमेदवार असल्याने ही निवडणूक बिनविरोध होऊन शिवसेना शिंदे गटाच्या विजयाचे दार उघडले आहे.
ठाणे-पालघर मतदारसंघात महायुतीकडे सुमारे ७९० मतांचे संख्याबळ असून महाविकास आघाडीकडे सुमारे १३० मते आहेत. त्यामुळे विजयासाठी आवश्यक असलेले संख्याबळ विरोधकांकडे नव्हते. त्यातच मतफुटीची शक्यता निर्माण झाल्याने महाविकास आघाडीने माघार घेण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यातही निवडणुकीत पराभव पत्करण्यापेक्षा संघटना वाढवण्यासाठी भर देणे आवश्यक असल्याचे मत मांडत राष्ट्रवादी शरद पवार गटाने ही माघार घेतली असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
रवींद्र फाटक यांनी २०१६ मध्ये विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते वसंत डावखरे यांचा पराभव करून विजय मिळवला होता. आता दुसऱ्यांदा विधान परिषदेत बिनविरोध जाण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अतिशय विश्वासातील ते शिलेदार आहेत, त्यामुळे श्री. फाटक यांच्या विजयाकरिता उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे सर्वपक्षीय नेत्यांबरोबर असलेले संबंध या बिनविरोध निवडीत कामाला आल्याची चर्चा ठाण्यात सुरु आहे. भाजपाकडे जास्त संख्याबळ असतानाही शिवसेनेने ही जागा ताब्यात घेऊन ती बिनविरोध निवडून आणण्यामागे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांची किमया असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
बिनविरोध परंपरा कायम
ठाणे महापालिका निवडणुकीत महायुतीचे उमेदवार रविंद्र फाटक यांच्या पत्नी जयश्री फाटक यांनी देखील बिनविरोध निवडून येऊन महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे खाते उघडले होते. ही परंपरा विधान परिषद निवडणुकीत रविंद्र फाटक यांनी बिनविरोध निवडून येऊन कायम ठेवली.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475