ठाणे: नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी मंडळांनी सुरू केली आहे. मंडप उभारणीसाठी महापालिकेकडे आतापर्यंत तब्बल २३७ अर्ज दाखल झाले असताना केवळ ८० मंडळांनाच मंडप उभारणीची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे उर्वरित मंडळांना परवानगी कधी मिळणार, याकडे आता लक्ष लागले आहे.
नवरात्रोत्सवात शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणावर मंडप उभारले जातात. देवीची आरास, विद्युत रोषणाई, गरबा-दांडिया आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र, मंडपामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, पादचारी मार्ग अडविले जाऊ नयेत आणि अग्निसुरक्षेच्या नियमांचे पालन व्हावे, यासाठी महापालिकेकडून अर्जांची छाननी करून परवानगी दिली जाते.
लोकमान्यनगर-सावरकरनगर प्रभाग समितीकडे सर्वाधिक ४५ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी २२ मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर कळवा येथे २९, वर्तकनगरमध्ये २२, वागळे परिसरात १९, उथळसरमध्ये १९ आणि नौपाडा-कोपरी (नौपाडा विभाग) येथे १८ अर्ज दाखल झाले आहेत. मुंब्रा परिसरातून सहा अर्ज प्राप्त झाले आहेत. दिवा परिसरातही मंडळांकडून मंडप परवानगीसाठी अर्ज करण्यात आले आहेत.
महापालिकेकडे प्राप्त झालेल्या २३७ अर्जांपैकी ८० अर्ज ऑनलाइन, तर १५७ अर्ज ऑफलाइन पद्धतीने दाखल झाले आहेत. आतापर्यंत ८० मंडळांना परवानगी मिळाली असून उर्वरित अर्जांची छाननी सुरू आहे. मंडपाची जागा, वाहतुकीवरील परिणाम, अग्निसुरक्षा, सुरक्षित विद्युत जोडणी आणि आपत्कालीन मार्ग यासह विविध बाबी तपासल्यानंतर परवानगी दिली जात आहे.