जिल्हा

ऑनलाईन अर्ज करताच मिळणार मंडप परवानगी

ऑनलाईन अर्ज करताच मिळणार मंडप परवानगी
ऑनलाईन अर्ज करताच मिळणार मंडप परवानगी फोटो: ठाणे वैभव
गणेश मंडळांना दिलासा ठाणे: अवघ्या २० दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असून  मंडप परवानगीसाठी मंडळांना आता कुठेही खेटे घालण्याची गरज भासणार नाही. विविध परवानग्यांसाठी सुरू असलेली एक खिडकी योजना बाजुला सारली आहे. ऑनलाईन अर्ज करणार्‍यांना त्याच दिवशी परवानगी देण्याच्या सुचना पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी अधिकार्‍यांना दिल्या आहेत. ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी महापालिकेच्या कै नरेंद्र बल्लाळ सभागृहात एक बैठक घेतली. या बैठकीला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधी, पालिकेचे अधिकारी, वाहतूक पोलिस अधिकारी, महावितरण, टोरंट कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या रोषणाईसाठी रस्त्यावरील खांबामधून वीजजोडणी घेतली जात असल्याने एखादी दुर्घटना होण्याची भिती असते. अशा घटना घडू नयेत यासाठी गणेशोत्सव मंडळांनी रस्त्यावरील खांबातून रोषणाईसाठी वीज पुरवठा घेऊ नये. मंडळांनी तात्पुरत्या स्वरुपात घेतलेल्या वीज मीटरमधून विद्युत रोषणाईची वीज पुरवठा घ्यावा, अशा स्पष्ट सुचना आयुक्तांनी केल्या. ठाणे शहरातील तलाव प्रदुषित होऊ नयेत म्हणून गणेश मूर्ती विसर्जनासाठी पालिकेकडून यंदाही कृत्रिम तलाव तयार केले जाणार आहेत. कृत्रिम तलावात लहान मुले पोहण्यासाठी उतरून अपघात होऊ नयेत यासाठी २४ तास सुरक्षारक्षक नेमण्याचे आदेशही आयुक्तांनी यावेळी दिले. दीड दिवसांच्या गणेश मूर्ती विसर्जनापूर्वी सर्व तलावांची कामे पुर्ण व्हावीत, अशा स्पष्ट सुचनाही त्यांनी दिल्या. आगमन आणि विसर्जन मार्गावर वीज वितरण विभागाने पथक नेमावे. गणेश मंडळांच्या परिसरातील रस्त्यावरील कचरा उचलण्याबरोबरच परिसरात उत्सवादरम्यान आणि मिरवणुकीत फेरिवाले बसणार नाहीत याची दक्षता घेण्याचे सक्त सुचना दिल्या. गणेशोत्सवासाठी मंडळे तात्पुरती वीज जोडणी घेतात. त्यासाठी महावितरण कंपनीकडे अनामत रक्कम भरतात. परंतु तीन वर्षे उलटून सुद्धा ही रक्कम परत मिळत नाही. तसेच वीज मीटर सदोष असल्यामुळे देयक जास्त येते. याबाबत तक्रारी करण्यासाठी यंत्रणा उपलब्ध नाही. अनामत रक्कम परत मिळविण्यासाठी अर्ज करून फेर्‍या माराव्या लागतात. तरीही ती मिळत नाही, अशा तक्रारी मंडळांच्या प्रतिनिधींनी बैठकीत केल्या. त्यावर अनामत रक्कम परत केली जाते आणि त्यासाठी ऑनलाईनद्वारे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे, असा दावा महावितरणच्या अधिकार्‍यांनी केला. त्यांचा हा दावा चुकीचा असल्याचे सांगत मंडळांनी नाराजी व्यक्त केली. अखेर मंडळांना देण्यात येणारे वीज मीटर सदोष नसावेत. तसेच त्यांची देयकासंदर्भात तक्रार असेल तर तीचे निरसन करावे आणि अनामत रक्कमेतून ती रक्कम घेऊन उर्वरित रक्कम त्यांना द्यावी. ज्यांची तक्रार नसेल त्यांना अनामत रक्कम तत्काळ द्यावी. त्यासाठी एक खिडकी योजना राबविण्यात यावी, अशा सुचना आयुक्त बांगर यांनी केल्या. मंडळांचे प्रतिनिधी आणि पोलिसांमध्ये वाद निर्माण होऊ नयेत यासाठी प्रत्येक कृत्रिम तलावांच्या परिसरात किती फुटांची मूर्ती विसर्जित होऊ शकते, याचे फलक लावण्याचे आदेश आयुक्तांनी अधिकार्‍यांना दिले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475