महाराष्ट्र
माहुली-सुतारपाडा रस्ता धुवून गेला; १५० कुटुंबांचा संपर्क तुटला
माहुली-सुतारपाडा रस्ता धुवून गेला; १५० कुटुंबांचा संपर्क तुटला
फोटो: ठाणे वैभव
शहापूर : तालुक्यातील माहुली-आवाळे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या सुतारपाडा व खरपडेपाडा या दोन गावांना जोडणारा रस्ता संततधार पावसाने धूऊन गेला आहे. त्यामुळे या दोन्ही गावांचे दळणवळण बंद होऊन तालुक्याशी संपर्क तुटला आहे. तसेच शेतीचे नुकसान झाले आहे.
रविवारी पावसाने शहापूर तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले. या पावसामुळे शहापुरातील भारंगी नदीला पूर येऊन गुजराती बागेतील रहिवाशांच्या घरात पाणी शिरले तर वासिंद भागात 60 घरांना पुराच्या पाण्याचा फटका बसला. छोट्या-मोठ्या पुलांवरून पुराचे पाणी गेल्याने जनजीवन विस्कळित झाले होते. याच पुराच्या पाण्याचा फटका माहुली-आवाळे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या सुतारपाडा येथील 100 कुटुंबांना तर खरपडे पाडा येथील 50 कुटुंबांना बसला आहे. या पाड्यांना जोडणारा रस्ता संततधार पावसामुळे धुवून गेला. त्यामुळे येथील 150 कुटुंबांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. यामुळें सर्पदंश, हिंस्त्र प्राण्यांचे हल्ले, गरोदर स्त्री, लहान बाळ, वृध्द, अपंग व्यक्तींना निकडीची गरज भासल्यास रस्त्याअभावी प्राण गमवावे लागू शकतात. प्रशासनाने आदिवासी शेतकरी कुटुंबावर असे संकट येण्याअगोदरच योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी सर्व बाधित कुटुंबांची आहे.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475