जिल्हा
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहून महासभा तहकूब
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहून महासभा तहकूब
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन वेळेत काम संपविणारे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून ठाणे महापालिकेची पहिलीच सर्वसाधारण सभा तहकुब करण्यात आली.
महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे गटनेते नजीब मुल्ला, शिवसेनेचे गटनेते पवन कदम, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शानू पठाण, राम रेपाळे भाजपचे गटनेते मुकेश मोकाशी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून सभा तहकुबी मांडली होती. त्या सभा तहकुबीवर नजीब मुल्ला, राम रेपाळे, पवन कदम, मुकेश मोकाशी शानू पठाण, हणमंत जगदाळे, देवराम भोईर, राजन किणे, मालती पाटील, मनोज शिंदे यांच्यासह महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवकांनी भावना व्यक्त केल्या.
दिवंगत अजित पवार हे पुरोगामी विचारांचे होते. सूर्य उगवण्याच्या आधी ते लोकांची कामे करायला सुरुवात करायचे. रात्री उशिरापर्यंत गोरगरीब पीडित दलित आदिवासी अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्न तडीस लावत होते. समाजसेवा करताना प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन कायदेशीर मार्गाने कामे मार्गी लावण्याची त्यांची हातोटी होती. त्यांच्या जाण्याने राज्याचे मोठे नुकसान झाले असून असा नेता पुन्हा होणार नाही. त्यांनी वेळेला खूप महत्व दिले होते, अशी भावना नगरसेवकांनी व्यक्त केल्यानंतर महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण करून सभा तहकुब करण्यात आली. ही सभा आता २३ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475