ठाणे : दृश्यम चित्रपट पाहून वाढदिवसाची पार्टी आणि मोटर सायकल विकत घेण्यासाठी मित्राचा खून करणाऱ्या दोन अल्पवयीन मित्रांना कासारवडवली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
घोडबंदर मार्गांवरील आझादनगर येथे राहणारे चंद्रकांत कांबळे यांनी २४ सप्टेंबर रोजी कासारवडवली पोलिस ठाण्यात त्यांचा १७ वर्षाचा मुलगा हरवला असल्याची तक्रार कासारवडवली पोलिस ठाण्यात दाखल केली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना कासारवडवली पोलिसांनी दहावीतील दोन अल्पवयीन मित्रांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. खून झालेल्या मुलाच्या वर्गातील हे त्याचे मित्र आहेत. या मित्रापैकी एकाला वाढदिवसाच्या निमित्ताने पार्टी द्यायची होती तर दुसऱ्या मित्राला मोटर सायकल खरेदी करायची होती, परंतु त्यांच्याकडे पैसे नव्हते. खून झालेल्यास) मित्राच्या गळ्यात सोन्याची चेन होती, ती मिळविण्यासाठी या दोघांनी सिगारेट पिण्याच्या बहाण्याने त्या मुलाला ब्रह्माण्ड भागातील गर्द झाडी असलेल्या भागात घेऊन गेले, तिथे चाकूने भोसकून आणि दगडाने ठेचून मित्राचा खून केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याची कबुली या दोघांनी दिली. दृश्यम चित्रपट पाहून अल्पवयीन मुलाचा पत्ता लागू नये, याकरिता त्याचा मोबाईल फोडला तसेच दिशाभूल करण्यासाठी तो मोबाईल बसवर टाकल्याची माहिती या अल्पवयीन आरोपींनी दिल्याचे पोलिस उपायुक्त प्रशांत कदम यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी सुमारे ८० ते ९० सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. आरोपी दिशाभूल करण्यासाठी भावनिक होऊन त्याच्या कुटूंबाला खोटी माहिती देत असल्याचे उपायुक्त श्री. कदम यांनी सांगितले.