जिल्हा
जलजीवन मिशनची बिले रखडली, कंत्राटदारांनी काढला मोर्चा
जलजीवन मिशनची बिले रखडली, कंत्राटदारांनी काढला मोर्चा
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ठाणे जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत कंत्राटदारांनी कामे केली आहेत. मात्र, त्यांना अद्याप बिले अदा केली नाहीत. ही बिले तत्काळ अदा करावीत, या मागणीसाठी राज्य कंत्राटदार महासंघाच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
राज्य शासनाच्या विविध योजनेंतर्गत राज्यातील कंत्राटदार कामे करीत असतात. मात्र, त्यांची सुमारे 90 हजार कोटी रूपयांची देयके रखडली आहेत. ही देयके अदा करण्यासाठी राज्य कंत्राटदार महासंघाचा संघर्ष सुरू आहे. आता या देयकांमध्ये जल जीवन मिशनच्या देयकांचाही समावेश झाला आहे. ही देयके तत्काळ देण्यात यावीत, यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मोर्चेकऱ्यांनी शासनाचा निषेध केला. तसेच, हातात फलक घेऊन शेतकऱ्यांप्रमाणे आम्हीही आत्महत्या करायच्या का? असा सवाल उपस्थित केला.
ठाणे जिल्ह्यात जलजीवन योजनेंतर्गत 740 कामे करण्यात आली. 740 गावांतील घराघरात कंत्राटदारांनी पाणी पोहचविले आहे. ही योजना राज्य आणि केंद्र सरकारकडून राबविण्यात येत आहे. आम्ही वर्षभर काम केल्यानंतर केंद्राने हात वर केले आहेत. तर राज्य सरकार काहीही भाष्य करायला तयार नाही, असा आरोप मंगेश आवळे यांनी केला आहे.
या आंदोलनात कल्पेश केणी, भगवान भोईर, पिन पाटील, आकाश आव्हाड, अनंता पवार, अनिकेत ढालपे, कौस्तुभ राणे, काशिनाथ मुरबाडे, विक्रांत देशमुख, राणा ढोले, अनिल नलावडे, चेतन शिंदे, अविनाश तिवरेकर आदी सहभागी झाले होते.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475