करिअरची सुरुवात कशी आणि केव्हा झाली? - मला लहानपणी आईकडून नृत्याचे धडे मिळाले त्यामुळे नृत्याची आवड तर होतीच. परंतु त्याचसोबत मला सिनेसृष्टीचे आकर्षण होते. लहानपणीच मी अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहिले होते. मी 'मटा श्रावणक्वीन' सारख्या अनेक ब्युटी कॉन्टेस्ट जिंकले व त्यानंतर मी ढोलकीच्या तालावर हा कलर्स मराठी वाहिनीवरील रिॲलिटी शो केला व तिथून माझ्या करिअरची सुरुवात झाली. घाडगे अँड सून मालिकेतील कियारा या भूमिकेविषयी काय सांगाल? - सुरुवातीला मी नकारात्मक भूमिकेसाठी नकार दिला होता. परंतु मला सगळ्यांनीच खूप प्रोत्साहित केले. माझ्या ध्यानीमनीही नव्हते की या मालिकेतील ते पात्र एवढं गाजेल. खरी ओळख मला कियारा या भूमिकेनेच दिली. याच भूमिकेमुळे मला मज्जा डिजिटलचा बेस्ट ॲक्टर्सचा किताब मिळाला. बाहेरही मला अनेकजण कियु बेबी म्हणूनच ओळखायचे. नकारात्मक भूमिका साकारताना कोणते अनुभव आले? - घाडगे आणि सून मालिकेत काम करत असताना मला जाणवले की मालिका बघत असताना प्रेक्षक त्या पात्रांमध्ये किती गुंतलेले असतात. मालिकेत काम करणारे पात्र आणि वैयक्तिक आयुष्यात ती व्यक्ती यातील फरकच ते विसरून जातात. मालिका सुरू होती तेव्हा अनेक महिला मला मस्करीत हाताला धरून किती त्रास देतेस अक्षयला? असे अनेक जाब विचारत. अनेक किस्से घडायचे. परंतु त्यातून मला प्रेक्षकांचे प्रेमच मिळायचे व ते माझ्या कामाचे मी बक्षीसच समजते. सिनेसृष्टीतील तुमचा आदर्श कोण आहे? - मी अजूनही माधुरी दीक्षितवर खूप प्रेम करते. तिचे हावभाव, बोलण्याची पद्धत, उर्दू अल्फाज मला मनापासून आवडतात. त्याव्यतिरिक्त आताच्या अभिनेत्रींमध्ये सांगायचे झाले तर आलिया भटचे काम मला खूप आवडते. काम करत असताना स्त्री म्हणून काही आव्हाने समोर येतात का? - जी जेनरिक आव्हाने सर्वच क्षेत्रातील महिलांना काम करत असताना येतात तीच आव्हाने मलाही येतात. आपली संस्कृती पुरुषप्रधान असल्याने काही आव्हाने ही येतच असतात. महिला महिलांचीच साथ अनेकदा देत नाहीत असे मी अनेकदा अनुभवले आहे. जर दोन महिलांनी एकत्रित काम केले तर याचा नक्कीच फायदा होईल असे मला वाटते. ऑल द बेस्ट नाटक करताना अनुभव कसा होता? - नाटकाचा हा अनुभव खूपच मस्त होता. आधी मालिका मग नाटक आणि आता येणारा चित्रपट असे मागे वळून बघत असताना आता मी असे म्हणू शकते की, मी मनोरंजनाच्या महत्त्वाच्या तीनही क्षेत्रात काम केले आहे. नाटक करत असताना नाटकाची डिलिव्हरी फार वेगळी असते, ते मला ऑल द बेस्ट करत असताना शिकायला मिळाले. माझी सगळी टीम सुद्धा खूप मस्त होती. त्यामुळे काम करतानाही धमाल यायची. प्रेक्षक कौतुक करत असताना जेव्हा हे तुझं पहिलं नाटक आहे असे अजिबात वाटत नाही असे म्हणायचे तेव्हा मला तिथेच माझ्या कामाची पोचपावती मिळायची. स ला ते स ला ना ते या चित्रपटातील तुमच्या भूमिकेविषयी काय सांगाल? - ७ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातील माझी भूमिका फारच वेगळी आहे. आतापर्यंत मी साकारलेल्या भूमिका या बहिर्मुख (एक्ट्राव्हर्ट) पद्धतीच्या होत्या. स ला ते स ला ना ते मधील माझी भूमिका याच्या अगदी विरुद्ध आहे. शांत, सोज्वळ अशी ही भूमिका आहे. बाकी सर्व तुम्हाला चित्रपट पाहताना नक्कीच कळेल. तुम्हाला तुमच्या या प्रवासात कुटुंबाचा पाठिंबा कसा मिळाला? - मी आता जे काही आहे ते फक्त माझ्या आई-वडिलांमुळेच आहे. ढोलकीच्या तालावर करत असताना तो शो खूप वेळ चालायचा. अशा वेळी माझे आई-बाबा तिथे बसून असायचे. शिक्षण घेत असताना सुद्धा त्यांनी मला प्रत्येकवेळी आधार दिला आहे, समजून घेतले आहे. माझे आर्थिक, ॲडमिनीस्ट्रेशन, मार्केटिंग सगळंच आता माझे बाबा बघतात. तपस्या संगीत अकॅडमी विषयी थोडक्यात. - माझी आई शास्त्रीय संगीत विशारद व कथ्थक विशारद आहे. तिच्याकडूनच मी नृत्याचे धडे घेतले. ठाणे शहरात तपस्या संगीत अकॅडमीच्या आठ शाखा आईच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून तीसहून अधिक प्रशिक्षक या अकॅडमीचा भाग आहेत. दरवर्षी दीड हजाराहून अधिक विद्यार्थी अकॅडमीतून गंधर्वाच्या परीक्षा देतात. माझ्या आईचे हे स्वप्न होते व त्या स्वप्नाचे आज एका मोठ्या अकॅडमीमध्ये रूपांतर झाले आहे याचा मला आनंद आहे.
GENERAL
सिनेसृष्टीत काम करत असताना तटस्थ राहणे महत्वाचे - ऋचा अग्निहोत्र
सिनेसृष्टीत काम करत असताना तटस्थ राहणे महत्वाचे - ऋचा अग्निहोत्र
फोटो: ठाणे वैभव
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475