ठाणे: ठाण्यातील अंतर्गत वाहतुकीचे चित्र बदलण्यासाठी ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. या प्रकल्पाविषयी ठाणेकरांच्या मनात असलेले प्रश्न, संभ्रम यांची उत्तरे शोधण्यासाठी ‘रोटरी क्लब ऑफ ठाणे’ यांनी ‘महा मेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्या मुलाखतीचे आयोजन केले आहे. त्यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार आणि विश्लेषक डॉ. उदय निरगुडकर संवाद साधणार आहेत.
गुरूवार, १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वा. गडकरी रंगायतन येथे ही मुलाखत होणार असून ती सगळ्यांसाठी विनामूल्य खुली आहे. ठाणे शहराच्या अंतर्गत भागात एकूण २९ कि.मी. लांबीची रिंग मेट्रो येणार आहे. या मेट्रोच्या आवश्यकतेबाबत, मार्ग आखणीबाबत तसेच, त्याच्या एकूण परिणामाबाबत ठाणेकरांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांचा वेध या मुलाखतीत घेण्यात येणार आहे. ‘महा मेट्रो’ने यापूर्वी, नागपूर आणि पुणे येथे मेट्रो मार्ग बांधले असून त्या मार्गांच्या विस्ताराचे काम सध्या सुरू आहे. तर, नवी मुंबईतील मेट्रो मार्गाचे संचालनही महामेट्रोद्वारे करण्यात येत आहे. या मुलाखतीसाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे. पहिल्या काही रांगा रोटरी क्लबच्या सदस्यांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.
दरम्यान, महा मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकांना ठाणे रिंग मेट्रोबाबत काही प्रश्न विचारायचे असल्यास ते कार्यक्रमाच्या आधी रंगायतन येथे आयोजकांकडे देण्यात यावेत, असे आवाहनही रोटरी क्लब ऑफ यांनी केले आहे. त्यातील निवडक प्रश्न डॉ. उदय निरगुडकर त्यांच्या प्रश्नावलीत समाविष्ट करणार आहेत.