जिल्हा
कळव्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचा तरण तलाव
कळव्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचा तरण तलाव
फोटो: ठाणे वैभव
बहुद्देशीय क्रीडा संकुलाची होणार उभारणी
ठाणे : कळवा येथील यशवंत रामा साळवी तरण तलावाचा पुनर्विकास करून त्या ठिकाणी ऑलिम्पिक मानकांनुसार अत्याधुनिक बहुद्देशीय क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. सुमारे ५० कोटी रुपयांच्या निधीतून साकारल्या जाणाऱ्या या प्रकल्पात जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा निर्माण केल्या जातील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले.
मनीषा नगर येथील तरण तलाव १९९१ साली उभारण्यात आला. अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील जलतरण स्पर्धांचे आयोजन येथे करण्यात आले आहे. हजारो खेळाडूंनी येथे नियमित सराव व प्रशिक्षण घेतले आहे. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर तसेच बदलत्या क्रीडा मानकांनुसार अत्याधुनिक सुविधांची आवश्यकता लक्षात घेत या परिसराचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे नगरसेविका प्रमिला केणी आणि मंदार केणी यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. खा.शिंदे यांनी पुढाकार घेतल्याने हा प्रकल्प उभा राहणार आहे.
बहुउद्देशीय क्रीडा संकुल विविध इनडोअर क्रीडा प्रकारांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देणार आहे. टेबल टेनिस, बॅडमिंटन, बुद्धिबळ, कॅरम, मार्शल आर्ट्स, पिकलबॉल, बास्केटबॉल, स्केटिंग, कबड्डी, बॉक्स क्रिकेट, पॅडल बॉल यांसारख्या विविध क्रीडा प्रकारांसाठी स्वतंत्र विभाग असतील. याशिवाय अत्याधुनिक जिम्नॅशियम, योगा सेंटर, खेळाडूंसाठी स्वतंत्र चेंजिंग रूम, स्नानगृहे व आवश्यक पूरक सुविधा उभारण्यात येतील. त्यामुळे विविध खेळांचा सराव करणाऱ्या खेळाडूंना एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध केल्या जातील.क्रीडा संकुलाची उभारणी करताना खेळाडूंसह प्रेक्षकांच्या सुविधांचाही विचार करण्यात आला आहे. विविध क्रीडा प्रकारांसाठी स्वतंत्र प्रेक्षक दालन, प्रशस्त दर्शनी भाग, प्रशासकीय कार्यालय, कॅफेटेरिया, सुमारे २७५ आसनक्षमतेचा बँक्वेट हॉल, प्री-फंक्शन एरिया, सुमारे १५० दुचाकी आणि ५० हून अधिक चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था तसेच कार लिफ्ट अशा विविध सुविधा या संकुलात असतील.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475