जिल्हा
शहापूरमध्ये गॅसटंचाईमुळे हॉटेल व्यवसाय ठप्प
शहापूरमध्ये गॅसटंचाईमुळे हॉटेल व्यवसाय ठप्प
फोटो: ठाणे वैभव
हॉटेल चालक-मालकांची तहसीलदारांकडे धाव
शहापूर: देशभरात निर्माण झालेल्या एलपीजी (गॅस) टंचाईचा फटका हॉटेल व रेस्टॉरंट व्यवसायाला मोठ्या प्रमाणात बसत असून शहापूर तालुक्यातील हॉटेल चालकांना रोजच्या कामकाजात अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी, अशी मागणी हॉटेल चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष विजय देशमुख यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशात व्यावसायिक गॅस टंचाई निर्माण झाली असून त्याचा फटका थेट शहापूर तालुक्यातील हॉटेल व्यवसायाला बसला आहे. गॅसपुरवठा ठप्प झाल्यामुळे अनेक हॉटेल चालकांना आपली हॉटेल्स बंद ठेवावी लागत आहेत. या परिस्थितीमुळे हॉटेल चालक आणि त्यांच्या कामगारांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती निर्माण झाली आहे.
आधीच कोविड काळात दोन ते तीन वर्षे व्यवसाय बंद राहिल्याने आर्थिक फटका बसलेला असताना पुन्हा अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने हॉटेल व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. यासंदर्भात शहापूर तालुक्यातील सर्व हॉटेल चालक-मालकांनी तहसीलदारांकडे निवेदन देत गॅसपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
दररोज किमान एक तरी गॅस टाकी उपलब्ध करून दिल्यास हॉटेल्स तात्पुरत्या स्वरूपात सुरू ठेवता येतील, अशी विनंती त्यांनी केली आहे. या मागणीवर प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन हॉटेल व्यवसायाला दिलासा द्यावा, अशी मागणी हॉटेल चालक-मालक संघटनेकडून शहापूर तहसिलदार परमेश्वर कासुळे व पुरवठा आधिकारी डॉ.अमृता सूर्यवंशी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी हॉटेल चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष विजय देशमुख, उपाध्यक्ष संजय म्हसकर, अजित आळशी, सचिव उत्तम शेट्टी, प्रविण खारीक आदी पदाधिकारी उपस्थित होते.
300x450
300x600