क्रीडा

पिवळ्या रंगात पुन्हा सुवर्णकाळ? मेग लॅनिंगची नवी सुरुवात

पिवळ्या रंगात पुन्हा सुवर्णकाळ? मेग लॅनिंगची नवी सुरुवात
पिवळ्या रंगात पुन्हा सुवर्णकाळ? मेग लॅनिंगची नवी सुरुवात फोटो: ठाणे वैभव
सुपर सॅटरडेला दणक्यात सुरुवात होतेय, कारण नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडेमीत गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्झ आमने-सामने येत आहेत. दोन्ही संघांसाठी हा सामना केवळ गुणांसाठी नाही, तर आपली WPL कथा नव्याने लिहिण्याची संधी आहे. वूमन्स प्रीमियर लीगची (WPL) सुरुवातीची तीन वर्षे या दोन्ही संघांसाठी कठीण गेली होती. गुजरात जायंट्स पहिल्या दोन हंगामांत गुणतालिकेत शेवटच्या स्थानी राहिले, तर गेल्या मोसमात यूपी वॉरियर्झ तळाशी होते. पण या अपयशातूनच आशेचा किरण दिसतो. इथून पुढे जाण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे वर. याच जाणीवेने WPL 2026 पूर्वी दोन्ही फ्रँचायझींनी मोठे बदल केले. गुजरात जायंट्सने फक्त दोन खेळाडूंना कायम ठेवत, कर्णधार ऍश्ले गार्डनर आणि अनुभवी बेथ मूनीवर विश्वास दाखवला. यूपी वॉरियर्झने तर आणखी टोकाची भूमिका घेतली. त्यांनी फक्त एकच अनकॅप्ड भारतीय खेळाडू, श्वेता सेहरावत, कायम ठेवत नव्या सुरुवातीचा स्पष्ट संदेश दिला. यूपी वॉरियर्झचा यंदाचा भर अनुभव आणि तारांकित खेळाडूंवर असेल. माजी कर्णधार दीप्ती शर्मा पुन्हा संघात परतली आहे, तर डिआंड्रा डॉटिन आणि मेग लॅनिंगसारख्या आंतरराष्ट्रीय दिग्गजांमुळे संघाचा कणा मजबूत झाला आहे. मागील मोसमात गुजरातकडून खेळलेली डॉटिन आपल्या जुन्या संघाविरुद्ध ठसा उमटवायला उत्सुक असेल. तर ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार लॅनिंगसाठी हा नवा अध्याय आहे. दिल्ली कॅपिटल्सला सलग तीन वेळा अंतिम फेरीत नेल्यानंतर आता ती तिच्या आवडीच्या पिवळ्या जर्सीत मैदानात उतरणार आहे. याच पिवळ्या जर्सीत तिने ऑस्ट्रेलियासाठी दोन एकदिवसीय आणि पाच टी-20 विश्वचषक जिंकले आहेत. मात्र यूपीच्या या भक्कम फलंदाजीसमोर गुजरात जायंट्सची वेगवान गोलंदाजी मोठे आव्हान उभे करणार आहे. पॉवरप्लेमधील अचूक मारा करणारी रेणुका सिंग ठाकूर, तिच्यासोबत तरुण आणि तडफदार तितास साधू व काशवी गौतम, हा वेगवान मारा कुणालाही अडचणीत टाकू शकतो. फलंदाजीमध्येही गुजरातला मोठी आशा आहे. मागील हंगामातील सर्वात उजळ ठरलेली अनकॅप्ड फलंदाज भारती फुलमली हिने 67च्या सरासरीने आणि 173च्या स्ट्राइक रेटने प्रभावी कामगिरी बजावली. यूपी वॉरियर्झकडे मात्र ‘एक्स-फॅक्टर’ म्हणून सोलापूरची किरण नवगिरे आहे. तिच्यासाठी षटकार मारणे सहज-सोपे आहे. WPLमध्ये तिला अद्याप हवे ते यश मिळालेले नाही, तरी देशांतर्गत टी-20 क्रिकेटमधील 150 हून अधिक धावांची खेळी तिच्या क्षमतेची स्पष्ट साक्ष देते. योग्य भूमिका मिळाली तर ती सामना एकहाती फिरवू शकते. अभिमान, पुनरागमन आणि नव्या सुरुवातीचा प्रश्न असलेल्या या दुपारच्या सामन्याने सुपर सॅटरडेला रोमांचक सूर लावला आहे. आणि संध्याकाळी, WPL 2023 आणि WPL 2025च्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या दोन महानगरीय प्रतिस्पर्ध्यांमधील लढत चाहत्यांना दिवसभर थरारक क्रिकेटची मेजवानी देणार आहे. आमने-सामने (मागील 5 सामने) गुजरात जायंट्स – 3 | यूपी वॉरियर्झ – 2 सामन्याची थोडक्यात माहिती दिनांक: 10 जानेवारी 2026 वेळ: दुपारी 3 वाजता स्थळ: डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडेमी, नवी मुंबई थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, जिओहॉटस्टार

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475