क्रीडा

विजयाची ‘पंचमी’ साधणार का RCB?

विजयाची ‘पंचमी’ साधणार का RCB?
विजयाची ‘पंचमी’ साधणार का RCB? फोटो: ठाणे वैभव
वूमन्स प्रीमियर लीग (WPL) 2026 चा दुसरा आणि अंतिम टप्पा आज वडोदऱ्यातील कोटांबी स्टेडियमवर सुरू होत असून, पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि गुजरात जायंट्स (GG) आमने-सामने येणार आहेत. 2024 चे विजेते RCB, चारपैकी चार सामने जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थानावर विराजमान आहेत. दुसरीकडे, दोन विजयांसह दमदार सुरुवात करणाऱ्या गुजरात जायंट्सला सलग दोन पराभवांना सामोरे जावे लागले असून ते सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या मोसमात या दोन्ही संघांमध्ये नुकतीच झालेली लढत अजूनही ताजी आहे. त्या सामन्यात RCB ने 182 धावांचा भक्कम डोंगर उभारत गुजरातला 150 धावांत रोखत 32 धावांनी विजय मिळवला होता. शुक्रवारी एकमेकांविरुद्ध खेळल्यानंतर अवघ्या 72 तासांत पुन्हा एकदा हे दोन संघ आमने-सामने येत असल्याने या सामन्याची उत्सुकता अधिकच वाढली आहे. त्या सामन्यात RCB च्या मिडल ऑर्डरची क्षमता ठळकपणे दिसून आली. 43 धावांत चार विकेट्स गमावल्यानंतर रिचा घोष आणि राधा यादव यांनी केलेली 105 धावांची भागीदारी सामन्याची दिशा बदलणारी ठरली. त्यानंतर गोलंदाजांनी सूत्रे हाती घेतली. लॉरेन बेल आणि श्रेयंका पाटील यांनी जबरदस्त मारा करत एकूण आठ विकेट्स घेत गुजरातच्या फलंदाजीची घडी विस्कटली. पुन्हा एकदा या दोन संघांचा सामना होत असताना, लक्ष वेधून घेणार आहेत RCB चे माजी खेळाडू, जे आता गुजरात जायंट्सच्या जर्सीत दिसणार आहेत. रेणुका सिंग ठाकूर, सोफी डिव्हाइन आणि जॉर्जिया वेअरहॅम या तिघींनाही आपल्या जुन्या संघाविरुद्ध ठसा उमटवण्याची मोठी संधी आहे. अपेक्षेप्रमाणे रेणुकाकडे नव्या चेंडूची जबाबदारी देण्यात आली असून ती पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करत आहे. मात्र, या हंगामात तिच्याकडून अपेक्षित असलेला प्रभाव अजून दिसून आलेला नाही. डिव्हाइनने पहिल्या दोन सामन्यांत आक्रमक खेळी करत चमक दाखवली होती, पण मागील दोन सामन्यांत ती एकअंकी धावांत बाद झाली असून, हे दोन्ही सामने गुजरातने गमावले आहेत. समीकरण स्पष्ट आहे—डिव्हाइन चालली, तर गुजरात जिंकतो. मात्र, गोलंदाजीतील तिचे योगदान दुर्लक्षित करता येणार नाही. वेअरहॅमची कामगिरीही आतापर्यंत चढ-उताराची राहिली आहे. निर्णायक टप्प्यात गुजरातला या ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडूकडून फलंदाजी आणि गोलंदाजी, दोन्ही विभागात दमदार कामगिरीची अपेक्षा असेल. प्ले-ऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी गुजरात जायंट्सला आपली सर्वोत्तम कामगिरी पुन्हा गवसणे अत्यावश्यक आहे. त्याउलट, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने आतापर्यंत फारशी चूक केलेली नाही. ग्रेस हॅरिस आणि कर्णधार स्मृती मानधना यांनी सलामीला भक्कम सुरुवात दिली आहे, आणि जिथे ती कमी पडली, तिथे रिचा घोष आणि राधा यादव यांच्या नेतृत्वाखाली मधल्या फळीने जबाबदारी उचलली आहे. बेल आणि श्रेयंका जबरदस्त लयीत असल्याने RCB ची गोलंदाजी आक्रमणही मजबूत दिसते. दोन महत्वाचे गुण पणाला असताना या दुसऱ्या फेरीतील RCB–GG लढतीकडून रंगतदार सामना अपेक्षित आहे. WPL 2026 च्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्याची सुरुवात वडोदऱ्यात थरारक पद्धतीने होणार, हे निश्चित. आमने-सामने (मागील 5 सामने) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू - 3 | गुजरात जायंट्स - 2 सामन्याची थोडक्यात माहिती दिनांक - 19 जानेवारी, 2026 वेळ - संध्याकाळी 7.30 वाजता स्थळ - कोटांबी स्टेडियम, वडोदरा थेट प्रक्षेपण - जिओहॉटस्टार, स्टार स्पोर्ट्स नेटवर्क

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475