महाराष्ट्र
द्राक्ष बागायतदारांना गंडा; तीन व्यापाऱ्यांना अटक
द्राक्ष बागायतदारांना गंडा; तीन व्यापाऱ्यांना अटक
फोटो: ठाणे वैभव
सांगली : सातारा आणि सांगली जिल्ह्यातील विविध तालुक्यात तब्बल 110 द्राक्ष बागायतदारांना सुमारे साडेतीन कोटी रुपयांना गंडा घालणाऱ्या तीन द्राक्ष व्यापाऱ्यांना तासगाव पोलिसांनी जेरबंद केले आहे. यात ठाण्यातील व्यापाऱ्याचा समावेश आहे. सलीम सय्यद (रा. नाशिक) गंगाराम चव्हाण (रा. ठाणे) आणि एजंट पशुपती माळी (रा. सावर्डे) यांना अटक करण्यात आली आहे.
सांगली आणि सातारा जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून दुबईत द्राक्षं निर्यात करणार असल्याचे सांगून संबंधित व्यापाऱ्यांनी सुमारे 110 शेतकऱ्यांची साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक केली होती. वेगवेगळे पत्ते आणि खरेदीची ठिकाणे बदलून या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची लूट केली होती. या व्यापाऱ्यांकडून जवळपास साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक विटा, पलूस, मायणी आणि तासगाव परिसरात झाल्याची माहिती आहे. याबाबत तासगाव पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.
सांगली जिल्ह्यातील सावळज (ता. तासगाव) येथील द्राक्ष उत्पादक अंकुश माळी यांनी तासगाव पोलिसांकडे 21 ते 24 फेब्रुवारी 2023 या काळात सलीम सय्यद या व्यापाऱ्याने नऊ लाख 23 हजार रुपयांची द्राक्षे खरेदी करून फसवणूक केल्याबाबत फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीनुसार तासगाव पोलिसांनी द्राक्ष व्यापाऱ्याचा कसून तपास केला होता. संबंधित व्यापारी सांगली, नाशिक, मुंबई अशा वेगवेगळ्या पत्त्यावर राहण्यासाठी होता. गेल्या महिन्याभरापासून पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर अहमदनगर येथे सासरवाडीत सलीम सरदार सय्यद हा व्यापारी सापडला. त्याला अटक करून त्याच्याकडे कसून तपास केल्यानंतर इतर व्यापाऱ्यांची माहिती मिळाली. याच प्रकरणात द्राक्ष खरेदी करणारा मूळ सावर्डेमधील आणि सध्या दुबईत वास्तव्यास असणाऱ्या अधिक पवारवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475