जिल्हा

गायमुख घाट रस्त्यावरील खड्ड्यांची कटकट संपणार

गायमुख घाट रस्त्यावरील खड्ड्यांची कटकट संपणार
गायमुख घाट रस्त्यावरील खड्ड्यांची कटकट संपणार फोटो: ठाणे वैभव
दुरुस्तीसाठी रॅपिड हार्डनिंग कॉंक्रिटचा प्रयोग करण्याचे आयुक्तांचे निर्देश ठाणे: काजूपाडा, चेना गाव ते गायमुख घाट या रस्त्याची स्थिती अतिशय खराब झाली आहे. नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर केलेली दुरुस्ती पावसाळ्यात टिकून राहावी यासाठी, रॅपिड हार्डनिंग कॉंक्रिटचा प्रयोग करून या घाट रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. फाऊंटन हॉटेल ते गायमुख घाट या ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या रस्त्याची स्थिती अतिशय बिकट आहे. त्यावर खडी टाकून, डांबराने ग्राऊटींग केल्यावरही हा रस्ता वारंवार उखडला जात आहे. त्यामुळे या पट्ट्यात सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक मंदावते. वाहने उलट्या दिशेने येऊ लागतात. गर्दीच्या वेळी येथील वाहतूक कोंडीचा परिणाम मुंबई-अहमदाबाद रोडवर चिंचोटीपर्यंत जाणवतो. तसेच, मीरारोडपर्यंतही वाहनांचा खोळंबा होत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत दिली. या रस्त्याचा मूळ ढाचा वाहून गेला असल्याने तेथे कोणतीही उपाययोजना टिकत नाही. मात्र, वाहतुकीच्या सोयीसाठी वारंवार रस्त्याची दुरुस्ती करत असल्याची माहिती मीरा-भाईंदर महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यांनी दिली. पावसाळा असल्याने खड्डे भरताना रॅपिड हार्डनिंग कॉंक्रिटचा वापर करण्याची सूचना नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांनी केली. रॅपिड हार्डनिंग कॉंक्रिटचा प्रयोग मीरा-भाईंदर महापालिकेने तत्काळ करून पाहावा. हे कॉंक्रिट कमीत कमी वेळात एकजीव होते. त्यामुळे रस्ता बंद न करता दुरुस्ती शक्य होते. नागरिकांना घाट रस्त्याच्या स्थितीमुळे खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर घाट परिसर लगेच त्याच पद्धतीने दुरुस्त करून वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले. उपलब्ध सर्व यंत्रणेचा वापर करून स्थानिक पोलिसांशी समन्वय साधून चार तासांच्या अवधीत एखाद्या मार्गिकेवरील पट्ट्यात हा प्रयोग करावा, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात झालेल्या या बैठकीस, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, उपायुक्त दिनेश तायडे, उपनगर अभियंता विकास ढोले, घोडबंदर रोडचे समन्वयक कार्यकारी अभियंता संजय कदम यांच्यासह मीरा-भाईंदर महापालिका, एमएमआरडीए, वन विभाग यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याच बैठकीत, घोडबंदर रस्त्यावरील सेवा रस्ता आणि मुख्य रस्ता यांच्या एकत्रीकरणाचे काम पावसाळ्यामुळे थांबलेले आहे. काही ठिकाणी एकत्रीकरण झाले असले तरी मूळ रस्ता आणि नवीन रस्ता यांच्यात काही ठिकाणी अंतर पडले आहे. त्यामुळे संपूर्ण घोडबंदर रस्त्याची एमएमआरडीएने लगेच पाहणी करून आवश्यक तेथे रस्ता एकसमान करावा आणि दुरुस्ती करावी. त्याचबरोबर, सार्वजनिक बांधकाम विभागाने कासारवडवली सिग्नल, ओवळा सिग्नल, कापूरबावडी उड्डाणपूल येथील रस्त्याची दुरूस्ती तत्काळ पूर्ण करावी, असेही निर्देश आयुक्त राव यांनी दिले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475