* छाननीत भाजपचे दोन अर्ज बाद
* आयुक्त-महापौरांच्या भूमिकेवर भाजपचा आक्षेप
उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेत १ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडणुकीत शिवसेनेने आपले वर्चस्व कायम राखत पाच जागांवर विजय मिळवला, तर भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) वाट्याला दोन जागा आल्या आहेत.
छाननी प्रक्रियेतील राजकीय नाट्य, भाजपचे अर्ज बाद होणे आणि सत्ताधाऱ्यांमधील वादंगानंतर अखेर सातही उमेदवारांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाली. मात्र, या निवडीच्या कायदेशीर प्रक्रियेवर आक्षेप घेत भाजपने न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिल्याने पालिकेतील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.
सध्या पालिकेत भाजपचे ३७ तर शिवसेनेचे ३४ नगरसेवक असे संख्याबळ आहे. महापौर अश्विनी निकम यांच्याबाबत सभागृहात अपशब्द वापरल्याप्रकरणी भाजप नगरसेवक प्रधान पाटील यांना तीन सर्वसाधारण सभांसाठी निलंबित करण्यात आले होते. निलंबनाची कारवाई झालेली असतानाही पाटील निवडणुकीसाठी सभागृहात उपस्थित राहिल्याने त्यांना सुरक्षारक्षकांमार्फत सभागृहाबाहेर काढण्यात आले.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान भाजपकडून धनंजय बोडारे, राजेंद्र श्रीखंडे, कपिल अडसूळ आणि प्रदीप रामचंदानी या चार जणांचे अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र, छाननीदरम्यान तांत्रिक त्रुटींमुळे कपिल अडसूळ आणि प्रदीप रामचंदानी यांचे अर्ज बाद झाले. भाजपकडे अतिरिक्त किंवा पर्यायी अर्ज उपलब्ध नसल्याने पक्षासमोर मोठा राजकीय पेच निर्माण झाला.
निर्माण झालेल्या पेचातून मार्ग काढण्यासाठी भाजपने महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्याकडे ऐनवेळी दोन नगरसेवकांच्या नावाची नवीन शिफारस केली. मात्र, या प्रक्रियेवर शिवसेनेचे सभागृह नेते अरुण आशान आणि नाना बागुल यांनी जोरदार आक्षेप घेतला. "अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर अशा प्रकारे नवीने शिफारस करुन नावे देणे कायद्याने योग्य आहे का?" असा सवाल उपस्थित करत त्यांनी तांत्रिक मुद्दे मांडले.
शिवसेनेच्या आक्षेपानंतर आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी सावध भूमिका घेतली. "ही शिफारस मी स्वीकारून पुढे पाठवली असली, तरी ती स्वीकारणे किंवा फेटाळणे हा सभागृहाचा आणि सदस्यांचा अधिकार आहे," असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. त्यानंतर महापौरांनी स्वीकृत नगरसेवकांच्या पत्राचा स्वीकार करत निवडीवर अंतिम शिक्कामोर्तब केले.
शिवसेनेकडून २० पेक्षा जास्त अर्ज दाखल झाले असल्याने त्यांच्याकडे पुरेसे पर्याय उपलब्ध होते. या निवडणुकीत 'वंचित बहुजन आघाडी'च्या दोन नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. या राजकीय समीकरणांमुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आशा पवार यांची शिवसेनेच्या कोट्यातून स्वीकृत नगरसेविका म्हणून वर्णी लागली. शिवसेनेच्या पाच स्वीकृत नगरसेवकांची निवड झाली असून यात पंचम कालानी, रमेश चौहान, हेमा पिंजानी, निलेश बोबडे, आशा पवार (वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा) यांचा समावेश असून भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र श्रीखंडे, धनंजय बोडारे या दोघांची निवड झाली आहे.
या सर्व घडामोडींवर भाजपचे गटनेते राजेश वधारिया यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. "आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी शिफारस केल्यानंतरही शिवसेनेने ती बेकायदेशीरपणे धुडकावून लावली आहे. सत्ताधाऱ्यांची ही भूमिका पूर्णपणे अयोग्य असून, या अन्यायाविरोधात आम्ही लवकरच न्यायालयात धाव घेऊ," असा इशारा वधारिया यांनी दिला आहे.