* महाराष्ट्र सागरी मंडळाकडे प्रस्तावित कोपरी-पटणी पुलाबाबत हरकती
* एमएमआरडीएला कारवाईचे निर्देश
ठाणे: खाडीच्या पाण्यावर विकासाचा पूल उभा राहत असताना, पिढ्यान्पिढ्या याच खाडीवर उपजीविका करणाऱ्या कोळी समाजाच्या पारंपरिक हक्कांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोपरी-पटणी प्रस्तावित केबल-स्टेड पुलाला मच्छीमारांनी आक्षेप घेतला असून, त्यांच्या लेखी हरकतींची दखल घेत महाराष्ट्र सागरी मंडळाने (एमएमबी) एमएमआरडीएला या हरकतींची शहानिशा करून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
*प्रस्तावित पुलाचा मार्ग रामसर स्थळ, चेंदणी बंदर, फ्लेमिंगो क्षेत्र आणि कांदळवन परिसराच्या जवळून जात असल्याने या भागातील पर्यावरणीय संवेदनशीलतेचा मुद्दाही पुढे आला आहे. स्थानिक कोळी समाजाच्या पारंपरिक मासेमारीवर तसेच सार्वजनिक वापराच्या जागांवर प्रकल्पाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.*
एमएमआरडीएच्या मागणीनुसार एमएमबीने यापूर्वी पुलाच्या बांधकामासाठी १०० मीटर हॉरिझॉन्टल क्लिअरन्स आणि १० मीटर व्हर्टिकल क्लिअरन्स निश्चित करून तात्पुरती नाहरकत दिली होती. मात्र, मच्छीमारांच्या लेखी हरकती प्राप्त झाल्यानंतर त्यांची योग्य शहानिशा करूनच पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
चेंदणी कोळीवाड्यातील रहिवासी तथा अखिल भारतीय कोळी समाजाचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद कोळी यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्र्यांकडे या प्रकल्पाबाबत हरकत नोंदविली होती. प्रस्तावित पुलामुळे पारंपरिक मासेमारी, किनारी जागा आणि स्थानिकांच्या सार्वजनिक वापराच्या जागांवर परिणाम होण्याची शक्यता त्यांनी मांडली आहे.
चेंदणी कोळीवाड्याच्या सीमांकनाची प्रक्रिया सुरू असताना प्रस्तावित पुलाचा मार्ग, बांधकाम क्षेत्र आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या जागांमुळे स्थानिकांच्या पारंपरिक वापरावर परिणाम होणार नाही, याची स्पष्टता आवश्यक आहे. मासेमारीसाठी वापरले जाणारे मार्ग, किनारी जागा आणि सार्वजनिक उपक्रमांच्या जागा या स्थानिक कोळी समाजाच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहेत. अंतिम क्रियाकर्म, नारळी पौर्णिमा, कोळी महोत्सव, गणपती व देवी विसर्जन यांसह विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांसाठीही या जागांचा पारंपरिक वापर केला जातो.
ठाणे खाडी परिसर कांदळवन, फ्लेमिंगो आणि अन्य जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यामुळे पुलाच्या बांधकामादरम्यान होणारे उत्खनन, बांधकाम साहित्याची ने-आण, वाहतूक आणि भविष्यातील वाढती वाहतूक यांचा खाडीच्या परिसंस्थेवर होणारा परिणाम याचे शास्त्रीय मूल्यांकन करणे महत्त्वाचे ठरणार आहे. विकासाच्या प्रकल्पासोबत पर्यावरण आणि स्थानिकांच्या उपजीविकेचा समतोल राखला जावा, हा मच्छीमारांचा मुद्दा आहे.
एमएमबीच्या निर्देशांनंतर आता एमएमआरडीएला मच्छीमारांच्या हरकतींची शहानिशा करून प्रकल्पाचा आराखडा आणि स्थानिक वापराच्या जागांवर होणारा संभाव्य परिणाम स्पष्ट करावा लागणार आहे. त्यामुळे विकासाच्या या पुलासोबत खाडीचे पर्यावरण आणि कोळी समाजाचे पारंपरिक हक्क कितपत अबाधित राहतात, याकडे लक्ष लागले आहे.
स्थानिक समाजाला विश्वासात घेऊनच प्रकल्प राबविण्याची मागणी करण्यात आली आहे. कोस्टल रोड, अंतर्गत रिंग मेट्रो, खाडीवरील पूल आणि वॉटरफ्रंटसारख्या प्रकल्पांमुळे पारंपरिक वापराच्या जागांवर परिणाम होत असल्यास स्थानिकांचा सहभाग आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण झाले पाहिजे, असे आनंद कोळी यांनी सांगितले.