जिल्हा

अखेर ठाण्यातून शिंदे गटाकडून रवींद्र फाटक

अखेर ठाण्यातून शिंदे गटाकडून रवींद्र फाटक
अखेर ठाण्यातून शिंदे गटाकडून रवींद्र फाटक फोटो: ठाणे वैभव
* विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेला चार जागा
* भाजप ११ जागा तर राष्ट्रवादी दोन जागांवर लढणार
ठाणे: स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत सुरु असलेला जागावाटपाचा घोळ संपला आहे. शिवसेनेला ठाण्यासह चार जागा मिळाल्या असून ठाण्यातून पुन्हा एकदा माजी आमदार रवींद्र फाटक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित झाले आहे. प्रचंड रस्सीखेच आणि जागांवरील दावे आणि प्रतिदाव्यानंतर 17 जागांसाठी तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाले आहे. अंतिम फॉर्म्युलानुसार भाजप 11, शिवसेना चार तर राष्ट्रवादी दोन जागांवर निवडणूक लढवणार आहेत. अतिरिक्त एक जागा पदरात पाडून घेण्यात राष्ट्रवादीला यश मिळाले आहे तर सात जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला चार जागांवर समाधान मानावे लागणार आहे.
ठाणे मतदारसंघाची जागा अपेक्षेप्रमाणे शिवसेनेला मिळाली असून माजी आमदार रवींद्र फाटक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अतिशय विश्वासातील ते नेते आहेत. त्यांना यापूर्वी ठाणे लोकसभा मतदार संघाची उमेदवाऱी मिळण्याची शक्यता होती, परंतु त्यावेळी नरेश म्हस्के यांना उमेदवाऱी देण्यात आली. त्यावेळी त्यांनी नाराजी व्यक्त न करता पक्षाचा आदेश मान्य केला होता. विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत देखील त्यांनी पक्षाचा आदेश मान्य केला होता, त्यामुळे श्री.फाटक यांना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उमेदवारी देऊन उपमुख्यमंत्री श्री. शिंदे हे निष्ठेचे फळ देतील, अशी चर्चा शिवसैनिकांमध्ये होत होती. आज त्यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर त्यांनी आनंदाश्रमात जाऊन स्व.आनंद दिघे यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाले. यावेळी खासदार नरेश म्हस्के, गटनेते पवन कदम, विकास रेपाळे आदी उपस्थित होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच राज्यात न झाल्याने या मतदारसंघामध्ये पूर्वी निवडून आलेल्या आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात येऊनही निवडणूक होऊ शकली नाही. अशात, गेल्या दोन-अडीच वर्षांपासून आमदारकीच्या जागा रिक्त आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण मतदार संख्येच्या 75 टक्के मतदार संख्या असेल तर विधान परिषदेची निवडणूक घेता येते. विधान परिषदेच्या एकूण 78 सदस्य संख्येपैकी 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून जात असतात. सोलापूर, अहमदनगर, ठाणे, जळगाव, नांदेड, सांगली-सातारा, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, नाशिक, अमरावतीच्या स्थानिक संस्थेच्या विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे.
भाजपच्या वाट्याला सोलापूर, जळगाव, भंडारा-गोंदिया, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, नागपूर, छ.संभाजीनगर-जालना, अहिल्यानगर, सांगली-सातारा आणि नांदेड या ११ जागा आल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाकडे ठाणे, नाशिक, परभणी आणि यवतमाळ तर राष्ट्रवादी काँग्रेसला कोकण आणि पुणे या दोन जागा मिळाल्या आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement 300x450

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement 300x600