लोकमान्यनगरमध्ये निर्धार मेळाव्यात सभागृह नेते हणमंत जगदाळे यांचा विश्वास
ठाणे: लोकमान्यनगर-शास्त्रीनगर परिसरातील एकाही बाधित कुटुंबाच्या पुनर्वसनाच्या हक्कावर अन्याय होऊ न देता क्लस्टर, पुनर्विकास, डीपी रस्ते आणि रिंग मेट्रोच्या अंमलबजावणीला गती देण्याचा विश्वास व्यक्त करताना ठामपाचे सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या हक्काच्या अधिकृत घरांच्या चाव्या त्यांच्या हातात दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त केला.
नागरिकांना हक्काची, अधिकृत आणि मालकी हक्काची घरे मिळवून देण्यासाठी तसेच परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी आयोजित निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी परिसरातील तब्बल १० हजारांपेक्षा अधिक रहिवासी यावेळी उपस्थित होते.
लोकमान्यनगर आणि शास्त्रीनगर या परिसरातील प्रत्येक कुटुंबाच्या सुख-दुःखाशी आपले नाते जोडलेले आहे. त्यामुळे या परिसराचा विकास आणि नागरिकांच्या हक्काच्या घरांचा प्रश्न हा केवळ राजकीय विषय नसून येणाऱ्या पिढ्यांच्या भविष्याशी संबंधित असल्याचे जगदाळे यांनी यावेळी सांगितले.
लोकमान्यनगर-शास्त्रीनगर परिसरातील अनेक नागरिक वर्षानुवर्षे दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये आणि जुन्या, अनधिकृत इमारतींमध्ये राहत आहेत. या नागरिकांना सुरक्षित आणि अधिकृत घरे मिळणे आवश्यक आहे. क्लस्टर पुनर्विकासाच्या माध्यमातून नागरिकांना याच परिसरात मालकी हक्काची घरे मिळावीत, ही आपली भूमिका आहे. मात्र, पुनर्विकासाच्या नावाखाली कोणत्याही कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही. सर्वेक्षण, बाधित कुटुंबांची निश्चिती, तात्पुरती व्यवस्था आणि कायमस्वरूपी पुनर्वसन याबाबतची प्रक्रिया त्यांनी नागरिकांसमोर स्पष्ट केली. मात्र, पुनर्विकासाच्या नावाखाली कोणत्याही कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही. किती कुटुंबे बाधित होणार आहेत, त्यांचे पुनर्वसन कुठे होणार आहे आणि त्यांना कोणत्या स्वरूपात घरे मिळणार आहेत याची माहिती हणमंत जगदाळे यांनी उपस्थितांना दिली.
क्लस्टर पुनर्विकासासोबतच परिसरातील डीपी रोड आणि रिंग मेट्रो हे प्रकल्पही नागरिकांच्या भविष्यासाठी महत्त्वाचे आहेत. या प्रकल्पांमुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यास आणि नियोजित विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. नागरिकांचे सुरक्षित पुनर्वसन आणि विकासकामांची अंमलबजावणी या दोन्ही गोष्टी एकाच वेळी साध्य करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे जगदाळे यांनी स्पष्ट केले.
पुनर्विकासाच्या प्रक्रियेत नागरिकांना विश्वासात घेणे, सर्वेक्षण पूर्ण करून बाधित कुटुंबांची निश्चित संख्या ठरवणे, तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करणे आणि कायमस्वरूपी पुनर्वसनाचा स्पष्ट आराखडा तयार करणे यावर जगदाळे यांनी भाष्य केले. तसेच ठाणे महानगरपालिका, म्हाडा, एमएमआरडीए आणि संबंधित शासकीय यंत्रणांशी समन्वय साधून प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मेळाव्यात नगरसेवक दिलीप बारटक्के, अमित सरैय्या, प्रशांत जाधवर, सिद्धार्थ ओवळेकर, योगेश जानकर, मनोज शिंदे, कांचन चिंदरकर, वनिता घोगरे, सरिता ठाकूर, दर्शना जानकर, यांच्यासह मनसेचे नेते अविनाश जाधव, रवींद्र मोरे, माजी नगरसेविका राधाबाई जाधवर, दिगंबर ठाकूर, संभाजी पंडित, संतोष पाटील, विजय चिंदरकर, आदी उपस्थित होते.