जिल्हा
खाजगी शाळेत सातवीच्या मुलीचा शिक्षकाकडून विनयभंग
खाजगी शाळेत सातवीच्या मुलीचा शिक्षकाकडून विनयभंग
फोटो: ठाणे वैभव
बदलापूर: बदलापुरात एका खाजगी शाळेत इयत्ता सातवीमध्ये, शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर एका शिक्षकाने अश्लील चाळे आणि तिच्यासोबत, गैरकृत्य करत असल्याची तक्रार मुलीने तिच्या आईकडे केली. यांनतर आज संबंधित शिक्षकावर बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
संबंधित शिक्षक दुर्दैवी मुलीला गेल्या तीन वर्षांपासून त्रास देत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलगी पाचवीमध्ये शिकत असताना, या शिक्षकाकडून हा प्रकार सुरु होता. यावेळी हा प्रकार इतका गंभीर नसावा असा विचार करुन, मुलीच्या आईने शाळेत जाऊन संबंधित प्रकार शाळेच्या निदर्शनास आणून दिला. मात्र यांनतर सुद्धा या विकृत शिक्षकाने अजूनही या मुलीसोबत गैरकृत्य सुरुच ठेवले. आणि या मुलीला संबंधित शिक्षकाने अश्लील वर्तन करत, संभाषण केले. एवढ्यावरच न थांबता या शिक्षकाने पीडित मुलीच्या आईबाबत देखील अश्लील टिप्पणी केली. यावेळी घाबरलेल्या मुलीने सगळी घटना घरी आल्यावर तिच्या आईला सांगितली.
मुलगी इतकी घाबरलेल्या अवस्थेत असल्याने तिला ताप भरला. त्यामुळे तिला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. यावेळी पीडित मुलीच्या आईने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे शहर उपाध्यक्ष अभिजित सकट यांच्याकडे यासंबंधी मदतीचे आवाहन केले. यांनतर अभिजित सकट यांनी, पोलिसांना तक्रार करत, शाळेत जाऊन जाब विचारला. विकृत चाळे करणाऱ्या शिक्षकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्या विरोधात बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात या प्रकरणी पोक्सोचा व मुलगी अनुसूचित जातीमध्ये असल्याने ॲट्रॉसिटीचा गुन्हा देखील नोंदविण्यात आला आहे.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475