जिल्हा
पाणी थकबाकीदारांना दणका; सात दिवसांत चार कोटी वसुल
पाणी थकबाकीदारांना दणका; सात दिवसांत चार कोटी वसुल
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून २७ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत शहरातील विविध प्रभाग समित्यांमधून एकूण चार कोटी २२ लाख ३५,७५० रुपयांची वसुली करण्यात आली आहे. थकबाकीदारांच्या विरोधात कठोर कारवाई करत १०३ नळजोडण्या तोडण्यात आल्या असून १७७ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तीन ठिकाणचे पंप जप्त करण्यात आले असून एक पंपरुम सील करण्यात आला आहे.
या कालावधीत प्रभाग समितीनिहाय वसुलीमध्ये मानपाडा प्रभाग समितीतून एक कोटी 14 लाख 65,750 रुपयांची वसुली करण्यात आली. कळवा प्रभाग समितीतून 59 लाख 5557 रुपयांची वसुली करण्यात आली असून 35 जणांचे नळ संयोजन खंडीत करण्यात आले. नौपाडा प्रभाग समितीतून 52 लाख , 98,941 रुपयांची वसुली करण्यात आली. 31 जणांची नळसंयोजने खंडीत करण्यात आली तर 60 जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. वर्तकनगर प्रभाग समितीतून 49 लाख 94,751 रुपयांची वसुली करण्यात आली असून पाच जणांची नळसंयोजने खंडीत करण्यात आली तर 20 जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. उथळसर प्रभाग समितीतून 36 लाख 61,836 रुपयांची वसुली करण्यात आली असून चार जणांचे नळसंयोजन खंडीत करण्यात आले.
लोकमान्य-सावरकरनगर प्रभागातून 31 लाख 37,858 रुपयांची वसुली करण्यात आली. 10 जणांची नळसंयोजने खंडीत करण्यात आली तर 97 जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. वागळे प्रभागातून 25 लाख 13,857 रुपयांची वसुली करण्यात आली. दिवा प्रभागातून 23 लाख 64,631 रुपयांची वसुली करण्यात आली असून 18 जणांची नळसंयोजने खंडीत करण्यात आली. तीन ठिकाणचे पंप जप्त तर एक पंप रुम सील करण्यात आला. मुंब्रा प्रभाग समितीतून 16 लाख 60,158 रुपयांची वसुली करण्यात आली. नागरी सुविधा केंद्राअंतर्गत 12 लाख 32,411 रुपयांची वसुली करण्यात आली.
महापालिकेची ही वसुली मोहिम यापुढेही अधिक तीव्र होणार असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले असून नागरिकांनी थकीत पाणीपट्टी तातडीने भरून कारवाई टाळावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
300x450
300x600