जिल्हा

नितीन कंपनी सिग्नलवर आता 'एआय'ची नजर

नितीन कंपनी सिग्नलवर आता 'एआय'ची नजर
नितीन कंपनी सिग्नलवर आता 'एआय'ची नजर फोटो: ठाणे वैभव
वाहनचालकांना नियम मोडणे पडणार महागात ठाणे : वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणे वाहन चालकांना आता महागात पडणार आहे. ठाण्यातील वर्दळीच्या नितीन कंपनी जंक्शनवर अत्याधुनिक इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) अंतर्गत आठ एआय-आधारित सीसी टीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात येत आहेत. सिग्नल जंपिंग, झेब्रा क्रॉसिंग ओलांडणे, स्टॉप लाईनचा भंग, ट्रिपल सीट, हेल्मेटविना दुचाकी चालविणे तसेच सीट बेल्ट न लावता वाहन चालविणाऱ्यांवर २४ तास नजर ठेवली जाणार आहे. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांनो सावधान...आता पोलिस नसले तरी कॅमेऱ्यांद्वारे कारवाई होणार आहे. ठाणे वाहतूक पोलीस उप आयुक्त पंकज शिरसाट यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत ठाणे वाहतूक आयुक्तालयाच्या हद्दीत तब्बल ३५० अत्याधुनिक आयटीएमएस कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे वाहतुकीला शिस्त लागण्यास मदत होणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ठाणे शहर, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कोपर, ठाकुर्ली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी या भागांचा समावेश आहे. या विस्तीर्ण परिसरातील वाहतूक अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (आयटीएमएस) लागू केली आहे. ठाणे शहरात ही प्रणाली १ सप्टेंबर २०२५ पासून कार्यान्वित करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात कॅडबरी जंक्शनवर १२ अत्याधुनिक कॅमेरे बसविण्यात आले आहेत. आता नितीन कंपनी जंक्शनवर ही प्रणाली सुरू होत आहे. नितीन कंपनी सिग्नलवर एकूण आठ हाय-डेफिनिशन कॅमेरे चारही दिशांनी येणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवतील. हे कॅमेरे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानावर आधारित असल्याने वाहनचालकांनी केलेले नियमभंग आपोआप टिपुन त्याची नोंद करतील. झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभे करणे, स्टॉप लाईन ओलांडणे, लाल सिग्नल तोडणे, दुचाकीवर तिघांचा प्रवास, हेल्मेटशिवाय वाहन चालविणे आणि चारचाकीत सीट बेल्ट न लावणे अशा विविध उल्लंघनांवर थेट कारवाई केली जाणार आहे. पुढील टप्प्यात तीनहात नाका, माजिवडा, कापुरबावडी, आनंदनगर, ओवळा, अंजूर फाटा, कल्याण नाका आणि दिघे चौक येथेही आयटीएमएस कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. संपूर्ण यंत्रणा २४ तास कार्यरत राहणार असून वाहतुकीवर सतत नजर ठेवली जाणार आहे. आयटीएमएस प्रणालीमुळे वाहतुक पोलीस आणि वाहन चालक यांच्यांतील रस्त्यावरील वाद टळणार असून गुन्हेगारीलाही आळा बसेल. तसेच दीर्घकालीन वाहतुक नियोजनाला मदत मिळणार आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास कॅमेऱ्याच्या पुराव्यावर आधारित दंडाची नोटीस थेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तेव्हा, सुरक्षित आणि शिस्तबद्ध शहरासाठी नियमांचे पालन करून सहकार्य करा, असे आवाहन श्री. शिरसाट यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475