आदित्य ठाकरे यांचा ठामपा प्रशासनावर हल्लाबोल
ठाणे : परदेशात पर्यावरणाच्या कारणावरून ज्या ॲमेझॉन डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध करण्यात आला, तोच प्रकल्प ठाण्यात प्रस्तावित करण्यात आला, अशी टीका ठाणे महापालिका प्रशासनावर करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सत्तेत आल्यानंतर हा प्रकल्प हद्दपार करू, असा इशारा दिला.
ठाणे महापालिकेच्या वतीने बाळकुम परिसरात ॲमेझॉन डेटा सेंटर प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या पर्यावरणीय परिणामांबाबत प्रश्न उपस्थित होत असताना आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी या प्रस्तावित प्रकल्पाच्या जागेला भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पामुळे पर्यावरणावर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत चिंता व्यक्त केली. यावेळी ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
ठाण्याच्या वाढत्या लोकसंख्येवर आणि आधीच ताण पडलेल्या नागरी सुविधांवर डेटा सेंटरचा अतिरिक्त भार पडण्याची शक्यता असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. प्रस्तावित प्रकल्पाचे दोन टप्पे तब्बल ५३ एकर क्षेत्रावर उभारले जाणार असून, २२ मजली इमारतीच्या स्वरूपातील या प्रकल्पामुळे पाणी, वीज, वाहतूक आणि पर्यावरणावर परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. डेटा सेंटरच्या कूलिंग व्यवस्थेसाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता भासणार असल्याचा दावा करीत ठाकरे यांनी ठाण्याच्या पाणीपुरवठ्यावर प्रश्न उपस्थित केला. त्याचबरोबर जनरेटरसाठी सुमारे पाच लाख लिटर डिझेल साठविण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. २४ तास ९० डेसिबलपर्यंत आवाज होणार असेल, तर त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे काय?” असा सवाल त्यांनी केला. प्रकल्पातून निर्माण होणारी उष्णता आजूबाजूच्या परिसरावर किती परिणाम करेल, मोठ्या प्रमाणावर काँक्रीटीकरण झाल्यानंतर स्थानिक तापमानात किती वाढ होईल, याचे स्पष्ट उत्तर प्रशासनाने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. डेटा सेंटरचा वापर मोठ्या प्रमाणावर परदेशातील कंपन्यांकडून होणार असेल, तर त्याचा ठाणेकरांना नेमका लाभ काय मिळणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
डेटा सेंटरपुरता विरोध मर्यादित न ठेवता ठाण्यातील पर्यावरणाच्या प्रश्नावरही ठाकरे यांनी सरकारला घेरले. “झाडांचे शहर म्हणून ठाण्याची ओळख आहे; मात्र विकासाच्या नावाखाली हजारो झाडांवर कुऱ्हाड चालविली जात आहे,” असा आरोप त्यांनी केला. शहरातील सुमारे ३,५०० झाडे तोडली जाणार असल्याचा दावा करीत त्यांनी वाढत्या काँक्रीटीकरणावर टीका केली.
मेट्रो आणि वाहतूक प्रकल्पांच्या नियोजनावरही आदित्य ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बसचे मार्ग बदलता येतात; मेट्रोचे पिलर उभे राहिल्यानंतर ते बदलणे शक्य नसते. त्यामुळे पादचारी, सायकलस्वार आणि सामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून नियोजन झाले पाहिजे, असे ते म्हणाले.
ठाण्यातील लोकप्रतिनिधींवर निशाणा साधताना “दोन आमदार, एक खासदार आणि चार नगरसेवक असूनही ठाणेकरांच्या प्रश्नांवर आवाज उठविणे अवघड आहे का?” असा सवाल ठाकरे यांनी केला. मी नेतृत्व करण्यासाठी आलो नाही. नागरिकांना माझ्या मदतीची गरज असेल तर आम्ही त्यांच्या सोबत उभे राहू. पक्षीय भेद बाजूला ठेवून ठाण्याच्या हितासाठी लढा उभारू. हा प्रकल्प इथून हलवायचा आहे आणि त्यासाठी नागरिकांनी एकत्र यावे,” असे आवाहन त्यांनी केले.
या प्रकल्पाला ठाणे महापालिकेच्या महासभेत गोंधळाच्या वातावरणात मंजुरी देण्यात आल्याचा आरोपही विरोधकांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकल्पावरून महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठली आहे. प्रकल्पाच्या मंजुरीची प्रक्रिया, पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास आणि नागरिकांच्या हिताचा विचार करण्यात आला आहे का, याबाबत पारदर्शकता आवश्यक असल्याचे ठाकरे यांनी म्हटले. त्यामुळे ॲमेझॉन डेटा सेंटर प्रकल्पाच्या मुद्द्यावरून ठाण्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.