जिल्हा
शिस्त-काटकसरीचे पथ्य; ठामपाचे हलके झाले दायित्व !
शिस्त-काटकसरीचे पथ्य; ठामपाचे हलके झाले दायित्व !
फोटो: ठाणे वैभव
पाच वर्षांत ३४०० कोटींची देणी आली ३५० कोटींवर!
ठाणे : आर्थिक संकटात सापडलेल्या ठाणे महापालिकेची आर्थिक घडी येत्या काही काळात पुन्हा भक्कम होण्याची चिन्हे आहेत. महापालिकेने स्वतःच्या निधीतून केलेल्या खर्चात केलेली काटकसर आणि केंद्राकडून मिळालेले २०० कोटींचे बिनव्याजी कर्ज यामुळे ठाणे महापालिकेवर असलेल्या दायित्वाचा आर्थिक भार फक्त ३५० कोटींवर आला आहे.
दरम्यान आणखी ५५८ कोटींच्या बिनव्याजी कर्जासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून येत्या काही काळात ठाणे महापालिकेवर दायित्व काहीच राहणार नाही. याशिवाय जीएसटीमधून येणारी रक्कम आणि पालिकेच्या विविध विभागातून येणाऱ्या उत्पन्नामुळे हा सर्व महसूल पालिकेच्या तिजोरीत जमा होणार असल्याने ठाणे महापालिकेला पुन्हा गत आर्थिक वैभव प्राप्त होण्याची शक्यता आहे.
कोव्हीड काळापासून ठाणे महापालिकेवर आर्थिक संकट निर्माण झाले असून अजूनही ठाणे महापालिकेला आर्थिक उभारी मिळू शकलेली नाही. पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पगार होतील एवढीच रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा होत आहे. केवळ मालमत्ता आणि शहर विकास विभागाच्या कराच्या माध्यमातून पालिकेच्या तिजोरीमध्ये विशिष्ट रक्कम जमा होत आहे. तर इतर खर्च भागवण्यासाठी महापालिकेला जीएसटीवरच अवलंबून राहावे लागत आहे. शहरातील अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प हे एकतर केंद्राच्या स्मार्ट सिटी मिशन या योजनेतून सुरु आहेत तर दुसरे काही महत्वाचे प्रकल्प हे राज्य शासनाच्या निधीमधून सुरु आहेत. त्यामुळे या प्रकल्पांचा आर्थिक भार महापालिकेवर पडलेला नाही.
चार वर्षांपासून ठाणे महापालिकेवर असलेले दायित्व तब्बल ३४०० कोटींचे होते. त्यानंतर दायित्वाचा भार २७४२ कोटींपर्यंत येऊन ठेपला होता. तत्कालीन पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी घालून दिलेले आर्थिक शिस्तीचे धोरण यामुळे दायित्वाचा भार गेल्या तीन वर्षात कमी झाला आहे. प्रत्येक वर्षी ६०० ते ७०० कोटींची बिले अदा करण्याचे नियोजन पालिका प्रशासनाने आखल्यामुळे आता हे दायित्व अवघे ३५० कोटींवर आले असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे.
केंद्र सरकारकडून ठाणे महापालिकेला २०० कोटींचे बिनव्याजी कर्ज यापूर्वीच मिळाले आहे. तर ५५८ कोटींच्या बिनव्याजी कर्जासाठी ठाणे महापालिकेने केंद्राकडे नव्याने प्रस्ताव पाठवला आहे. हे बिनव्याजी कर्ज फेडण्याचा कालावधी देखील मोठा असल्याने ठाणे महापालिकेला चांगल्या प्रकारे आर्थिक बळ मिळणार आहे. तर येत्या काही काळात दायित्वाचा भार शिल्लक राहणार नसल्याने पालिकेच्या तिजोरीत जवळपास १९०० कोटींचा महसूल जमा होणार आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेचे आर्थिक चक्र पुन्हा गतिमान होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
300x450
300x600