जिल्हा
अन्ननलिकेत अडकलेला कृत्रिम दातांचा सेट काढून रुग्णाला नवजीवन
अन्ननलिकेत अडकलेला कृत्रिम दातांचा सेट काढून रुग्णाला नवजीवन
फोटो: ठाणे वैभव
कल्याण : फोर्टिस हॉस्पिटल, कल्याण येथील डॉक्टरांनी एका ५४ वर्षीय रुग्णावर यशस्वी उपचार करत जवळपास महिनाभर अन्ननलिकेत अडकून राहिलेला कृत्रिम दातांचा सेट सुरक्षितपणे काढला आहे. या डेंचरमुळे रुग्णाला गिळताना त्रास, आवाज बसणे, वारंवार संसर्ग होणे आणि श्वास घेण्यास अडचण निर्माण झाली होती. नंतर त्याला श्वास घेताना मोठा आवाज येणे हा गंभीर त्रास सुरू झाला, जो श्वसनमार्ग बंद होण्याचे लक्षण असू शकते.
या रुग्णावर फोर्टिस हॉस्पिटल, कल्याण येथील डॉ. श्रेखा पद्माक्षन (ईएनटी तज्ज्ञ), डॉ. निकेश गोस्राणी (ईएनटी तज्ज्ञ) आणि डॉ. विनीत चौधरी (गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट) यांच्या बहुविशेषज्ञ टीमने उपचार केले. त्यांनी तातडीने रुग्णाचा श्वासमार्ग सुरक्षित केला, अडकलेला डेंचर काढला आणि रुग्णाचे श्वास घेणे, गिळणे व बोलणे ही कार्ये पूर्ववत केली. रुग्णाला जवळपास महिनाभर गिळताना त्रास आणि आवाजात बदल जाणवत होता. रुग्णालयात दाखल होण्याच्या आठवडाभर आधी त्याचा श्वास घेण्याचा त्रास वाढला. सुरुवातीला त्याने कोणतीही वस्तू गिळल्याचे सांगितले नव्हते, कारण त्यालाच डेंचर गिळल्याचे लक्षात आले नव्हते.
तपासणीदरम्यान एंडोस्कोपीमध्ये श्वसनमार्गावर परिणाम झाल्याची शक्यता दिसून आली. त्यानंतर केलेल्या सीटी स्कॅनमध्ये अन्ननलिकेच्या वरच्या भागात एक परकी वस्तू अडकलेली असल्याचे आढळले. पुढील एंडोस्कोपीमध्ये ती वस्तू मोठा कृत्रिम दातांचा सेट असल्याचे स्पष्ट झाले. अधिक चौकशी केल्यानंतर रुग्णाने सांगितले की त्याचा पार्शियल डेंचर जवळपास महिनाभरापासून हरवला होता. सीटी स्कॅन, एंडोस्कोपी आणि रुग्णाच्या माहितीच्या आधारे अडकलेली वस्तू हाच डेंचर असल्याचे निश्चित झाले.
महिनाभर डेंचर अडकून राहिल्यामुळे मान आणि घशामध्ये संसर्ग व सूज निर्माण झाली होती. त्यामुळे आवाजपेटीवर परिणाम झाला आणि श्वास घेणे तसेच गिळणे कठीण झाले. रुग्णाला स्ट्रायडर झाल्याने डॉक्टरांनी तातडीने ट्रॅकिओस्टॉमी करून श्वासमार्ग सुरक्षित केला. सुरुवातीला फ्लेक्सिबल एंडोस्कोपीद्वारे डेंचर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र तो मोठा व घट्ट अडकलेला असल्याने तो शक्य झाला नाही. त्यानंतर जनरल ॲनेस्थेशियाखाली रिजिड इसोफॅगोस्कोपी करून डेंचर यशस्वीरित्या काढण्यात आला.
300x450
300x600