शहापूर: विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसोबतच शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी गेली ३३ वर्षे सातत्याने कार्यरत असलेले कळगाव जिल्हा परिषद शाळेचे पदवीधर शिक्षक वैभव मांजे यांची ठाणे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांच्या प्रदीर्घ, गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सेवेला या पुरस्काराच्या माध्यमातून गौरविण्यात आले आहे.
वैभव मांजे यांनी १० ऑगस्ट १९९२ रोजी शिक्षकी सेवेत प्रवेश केला. बी.ए., बी.एड. अशी शैक्षणिक पात्रता असलेल्या मांजेगुरुजी यांनी आपल्या ३३ वर्षांच्या सेवेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला केंद्रस्थानी ठेवून विविध उपक्रम राबविले आहेत. त्यांच्या कार्यकाळात कळगाव जिल्हा परिषद शाळेने शैक्षणिक गुणवत्तेसोबतच स्वच्छता, भौतिक सुविधा आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
'मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा’ या उपक्रमांतर्गत कळगाव शाळेने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच ‘स्वच्छ सुंदर शाळा’ या उपक्रमातही शाळेने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशामागे शिक्षकांचे सातत्यपूर्ण प्रयत्न, विद्यार्थ्यांचा सहभाग आणि पालक व समाजाचे सहकार्य महत्त्वाचे ठरले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शाळेतील विद्यार्थी दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होतात. विद्यार्थ्यांना या परीक्षांसाठी मार्गदर्शन करून त्यांच्यात स्पर्धात्मक वृत्ती निर्माण करण्याचे काम केले जाते.
विविध सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व विविध आवश्यक वस्तूंचे वाटप केले जाते. शाळेत शंभर टक्के विद्यार्थी दाखल करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. शासनाच्या विविध शैक्षणिक व विद्यार्थी कल्याणकारी योजना प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवून त्यांना त्याचा लाभ मिळवून देण्यात ते अग्रेसर असतात.