जिल्हा

लोकांना जातीय-धार्मिक वादात गुंतवून ठेवण्याचा डाव

लोकांना जातीय-धार्मिक वादात गुंतवून ठेवण्याचा डाव
लोकांना जातीय-धार्मिक वादात गुंतवून ठेवण्याचा डाव फोटो: ठाणे वैभव
राज ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल

ठाणे : बेरोजगारी, आर्थिक परिस्थिती, शिक्षणासारखे प्रश्न गंभीर असताना जनतेला जातीय आणि धार्मिक वादांमध्ये गुंतवण्याचा भाजप सरकारचा डाव असल्याचा आरोप करत राज ठाकरे यांनी आगामी गणेशोत्सवाच्या काळात दंगली घडविण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त केली.

रविवारी गडकरी रंगायतन येथे मनसेच्या राज्यस्तरीय पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. सध्या देशात आणि राज्यात काय घडत आहे, याची वस्तुस्थिती मांडण्यासाठी तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांसह राज्यातील नागरिकांना सतर्क करण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. सुमारे तासभराच्या भाषणात त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारपासून सण-उत्सवांच्या आडून सुरू असलेल्या धिंगाण्यापर्यंत विविध मुद्द्यांचा आपल्या शैलीत समाचार घेतला. भाषणाच्या सुरुवातीला ‘धर्माभिमानी व्हा; धर्मांध होऊ नका,’ असे आवाहन करताना धर्माच्या नावावर निर्माण होणारा द्वेष समाजालाच मागे नेईल, असे त्यांनी सांगितले. सोशल मीडियावरील वादांमध्ये अडकण्यापेक्षा रोजगार, शिक्षण आणि अर्थव्यवस्थेच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

देशाच्या आर्थिक प्रगतीबाबत सरकारकडून ७.८ टक्के जीडीपीचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे, असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. अर्थव्यवस्था मजबूत असेल, तर नागरिक, तरुण आणि उद्योगपती परदेशात का जात आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. २०२१ ते २०२६ या काळात ५०३ विदेशी कंपन्यांनी भारतातील व्यवसाय बंद केल्याचा दावा त्यांनी केला. बेरोजगारी आणि रोजगाराच्या संधींच्या अभावामुळे तरुणाईसमोर निर्माण झालेल्या प्रश्नांकडेही त्यांनी लक्ष वेधले.

जीडीपीमध्ये आपण इतर देशांना मागे टाकले असेल, तर मग परदेशात का जाऊ नये, सोने का खरेदी करू नये, असा सवालही त्यांनी केला. मुंबई आणि रायगडमध्ये मोठ्या प्रमाणात जमिनी उद्योगपतींना देण्याचा सपाटा सुरू आहे. जमिनी गेल्यानंतर संबंधितांना रोजगार मिळत नाही, जंगलतोड होत आहे. मात्र, या प्रश्नांवर चर्चा न करता समाजाला धार्मिक आणि जातीय वादांमध्ये अडकवले जात असल्याची टीका त्यांनी केली.

एसआयआरची पहिली यादी प्रसिद्ध झाली आहे. राज्यातील दोन कोटी मतदारांची नावे यातून वगळण्यात आली आहेत. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे आणि डॉल्बीच्या वाढत्या वापरावरही ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रातील सण पारंपरिक पद्धतीने साजरे करण्याऐवजी इतर राज्यांतील ‘प्रथा’ स्वीकारल्या जात असल्याची टीका त्यांनी केली. इतर ठिकाणच्या गोविंदांमध्ये महिलांना स्टेजवर नाचवले जात असताना ठाण्यात मनसेच्या दहीहंडीत ‘ महाराष्ट्र गीत'  दुमदुमले, याचे कौतुकही त्यांनी केले. डॉल्बीच्या मोठ्या आवाजामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सणांच्या नावाखाली होणारा हा दणदणाट थांबला पाहिजे, अशी भूमिका आपण यापूर्वीच मांडली होती, असे ते म्हणाले. नवी मुंबईतील हिंदी संमेलन आणि मराठी-हिंदीच्या वादावरही त्यांनी भाष्य केले. अशा वादांमध्ये कार्यकर्त्यांनी अडकू नये, असे आवाहन त्यांनी केले.

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून इतक्या मोठ्या प्रमाणात मतदार सापडत नसतील किंवा मयत झाले असतील तर 2024 साली झालेल्या निवडणुकांमध्ये मतदान करणारे कोण होते? याचा अर्थ त्यावेळी बोगस मतदान झाले, असा आरोपही ठाकरे यांनी केला.


संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475